डॉकयार्ड-सीएसटी उन्नत रेल्वेमार्गाला तत्त्वत: मंजुरी; सीएसटी-कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी बदल

सीएसटी ते कुर्ला यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी अत्यावश्यक असलेल्या हार्बर मार्गाच्या प्लॅटफॉर्मचे स्थलांतर आता प्रत्यक्षात येणार आहे. सध्या सीएसटी स्थानकात एक आणि दोन क्रमांकाचे हे प्लॅटफॉर्म लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या प्लॅटफॉर्मपल्याड सरकवण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हार्बर मार्ग डॉकयार्ड रोडवरून पी. डिमेलो मार्गे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या बाजूला जाणार आहे. हा बदल झाल्यानंतर सीएसटी येथून निघणाऱ्या सध्याच्या हार्बर मार्गिका मुख्य मार्गावरील पाचवी-सहावी मार्गिका म्हणून काम करणार आहेत.

[jwplayer e2jd58H5]

सीएसटी ते कुर्ला यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे म्हणजेच कुर्ला ते परळ टप्प्याचे काम सुरू झाले आहे. परळपुढे ही मार्गिका आणताना भायखळा ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान अनेक खासगी बांधकामे स्थलांतरित करावी लागणार होती. येथील रहिवाशांचे स्थलांतर, त्यापोटी त्यांना द्यावी लागणारी भरपाई, कोणी विरोध केला, तर न्यायालयीन लढाईचा खर्च यात प्रचंड वेळ आणि पैसा जाणार होता. तसेच पाचवी-सहावी मार्गिका फक्त परळपर्यंत आल्याने उपनगरीय प्रवाशांना त्याचा फायदा मिळणे अशक्य आहे. उपनगरीय सेवेची क्षमता वाढवण्यासाठी हा मार्ग सीएसटीपर्यंत आणणे गरजेचे आहे. त्यासाठी हार्बर मार्गाचे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

प्रकल्पाला वेग येणार

आता या प्रकल्पासाठी येणारा खर्च, नियोजित वेळ, ठोस आरेखन आदी गोष्टींसह प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.

स्थलांतर कसे होणार?

*डॉकयार्ड रोड स्थानकानंतर हार्बर मार्गाच्या दोन्ही मार्गिका डावीकडे वाडीबंदर यार्डमधून पी. डिमेलो मार्गाकडे जाणार आहेत.

* पी. डिमेलो मार्गाजवळ पूर्व मुक्तमार्ग उतरतो त्यानंतरच्या जंक्शनच्या येथून या उन्नत मार्गिका पी. डिमेलो रोड ओलांडून मेन्शन रोडवर जातील.

* मेन्शन रोडवरून या मार्गिका कारनॅक बंदरापर्यंत उन्नत स्वरूपातच जाणार आहेत.

* कारनॅक बंदराजवळ या उन्नत मार्गिका पी. डिमेलो रोड ओलांडून पुन्हा रेल्वेच्या हद्दीत येतील.

* सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या पूर्वेकडे हार्बर मार्गाचे दोन उन्नत प्लॅटफॉर्म बांधले जातील.

प्रवाशांसाठी फायदे व तोटे!

* सीएसटी ते कुर्ला यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका झटपट तयार होण्यासाठी हा तोडगा निघणे आवश्यक आहे. त्यामुळे उपनगरीय फेऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. रेल्वेला या मार्गासाठी रहिवाशांचे स्थलांतर करण्याची गरज पडली नाही, तर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकेल.

’  मुख्य मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी हार्बर मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना मात्र आपला प्रवास प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या बाजूलाच संपवावा लागणार आहे. सध्या हार्बर मार्गावरील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १-२ येथे उतरल्यावर तेथून पुढे ऑफिस गाठण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या पल्याड उतरणाऱ्या प्रवाशांना किमान पाऊण ते एक किलोमीटर पायपीट करून मुख्य स्थानकात यावे लागणार आहे किंवा टॅक्सीचा जादा खर्च करावा लागणार आहे.

[jwplayer KYE2Yd1A]