डॉक्टर नसल्याने पाच दिवसांपासून तपासणी नाही; बाळाच्या जिवाच्या भीतीने सैरभैर

डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाची झळ सर्वसामान्य रुग्णांना बसत असतानाच, एक गर्भवती महिला गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयांचे हेलपाटे मारत आहे. गर्भाशयातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रसूतीदरम्यान अडथळा येण्याची भीती असल्याने आपल्या बाळाच्या जिवाच्या भीतीने या महिलेची धावाधाव सुरू आहे. पण केईएमपासून वाडिया रुग्णालयापर्यंत तिला उपचारासाठी नकारघंटाच मिळत आहे. ‘पोटात दुखायला लागले की मगच या’ अशी निर्ढावलेली उत्तरे मिळत असल्याने या महिलेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

शिवडी येथे राहणारी गौरी खलबाटे नावाची ही गर्भवती महिला गेल्या नऊ महिन्यांपासून केईएम रुग्णालयात तपासणीसाठी येत आहे. गेल्या आठवडय़ात गुरुवारी तपासणीदरम्यान गर्भाशयात पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळले. प्रसूतीदरम्यान अडथळा येण्याची शक्यता असल्याने शनिवारी तपासणीसाठी येण्याचे डॉक्टरांनी गौरीला सांगितले होते. मात्र शनिवारपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू झाला आणि बाह्य़ विभागात डॉक्टर उपस्थित नसल्याने गौरी हिला परत घरी जावे लागले. पुढील आठवडय़ातील २९ मार्चला डॉक्टरांनी प्रसूतीची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मात्र गर्भाशयात पाणी कमी असल्यामुळे बाळाला त्रास होईल या भीतीने गौरी गेले तीन दिवस रोज केईएमच्या फेऱ्या घालत आहे. तिने वाडिया रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता तिथेही डॉक्टर उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. सोनोग्राफी करण्यासाठी केईएम रुग्णालयातील सेवा बंद असल्यामुळे गुरुवारी तिने खासगी वैद्यकीय तपासणी केंद्रात जाऊन, १००० रुपये देऊन सोनोग्राफी केली. सोनोग्राफीतही गर्भाशयात पाणी कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच दिवशी गौरीने चाचणीची कागदपत्रे केईएममध्ये दाखविली. मात्र रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. संपामुळे केवळ आपत्कालीन विभाग सुरू आहे. त्यामुळे पोटात दुखायला लागले की मगच या, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे तिने सांगितले. घरात आर्थिक चणचण असल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणे अशक्य आहे, आणि शेवटच्या आठवडय़ात कुठलेच रुग्णालय दाखल करून घेत नाही, असेही गौरीने सांगितले. शुक्रवारी दुसरे डॉक्टर असल्यामुळे ते तपासणार नाहीत. आणि पुढच्या आठवडय़ात बुधवारी मला प्रसूतीची तारीख दिली आहे. अशा परिस्थितीत बाळाला काही त्रास झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न तिने उपस्थित केला.गौरीप्रमाणे आज सरकारी आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेले पाच दिवस येथील बाह्य़ विभाग बंद असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात अधिक पैसे खर्च करून उपचार करावे लागत आहेत. केईएम, शीव व नायर या रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभागही गुरुवारी बंद असल्यामुळे रुग्णांना खासगी केंद्रांची वाट धरावी लागली.

ताप, उलटीच्या रुग्णांवर आपत्कालीनउपचार

संपामुळे बहुतांश रुग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन विभाग सुरू आहे. त्यामुळे ताप, उलटय़ा असे आजार असलेल्या रुग्णांनाही आपत्कालीन परिस्थितीत दाखल करावे लागते. मात्र रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे या रुग्णांवर उपचार करणे अवघड जाते, असे वरिष्ठ डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

२५ हजार डॉक्टरांचे कामबंद

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) आणि ‘असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट’ (एएमसी) या संघटना गुरुवारी निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्याचा परिणाम मुंबईतील आरोग्य सेवेवर झाला. यामुळे मुंबईतील १५०० नर्सिग होम बंद होते, असे ‘एएमसी’चे डॉ. बिपिन पंडित यांनी सांगितले. यात केवळ गंभीर आजार असलेल्या रुग्णांना तपासले जात होते. तर अनेक खासगी रुग्णालयांतही बाह्य़विभाग बंद करण्यात आले होते. अनेक ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना काम बंद करण्याचे आवाहन केले. मुंबईतील २५ हजार डॉक्टर कामावर नसल्याचा दावा ‘आयएमए’ने केला आहे.