पालिकेला ‘गेट वेल सून’चे संदेश
सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी पुढाकार घेत स्वतचा एक दिवसाचा पगार दिला खरा.. पण प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी झारीतले शुक्राचार्य बनून त्यांचा हा निधी एक वर्ष उलटून गेल्यावरही संबंधित कुटुंबीयांना दिलेला नाही. सतत तगादा लावूनही दाद न देणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडून आता गांधीगिरीने उत्तर दिले जाणार आहे. पूर्ण आठवडाभर संबंधित अधिकाऱ्यांना फुले व ‘गेट वेल सून’चे संदेश दिले जाणार असून त्यानंतरही मदतीचा धनादेश तयार झाला नसल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षांत शिकत असलेल्या डॉ. किरण जाधव यांनी गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी वैयक्तिक कारणाने आत्महत्या केली. कुटुंबीयांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने राज्यभरातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एक दिवसाचा पगार जमा करून तो निधी देण्याचे ठरवले. यासंबंधीचे पत्रही मार्डकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे देण्यात आले व २३ ऑगस्ट २०१४ चे वेतन जमा करण्याच्या सूचनाही सर्व संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या. त्यानुसार पालिकेच्या सायन, नायर व केईएम ही तीन महाविद्यालये वगळता इतर ११ ठिकाणचा २५ लाख रुपयांचा निधी डॉ. जाधव यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. मात्र एक वर्ष उलटून गेल्यावरही प्रशासकीय कारणांचा बाऊ करत पालिकेकडून या निधीचा धनादेश काढण्यात कुचराई करण्यात येत आहे.
यासंबंधी २७ ऑगस्ट रोजी वृत्तपत्रांमधून बातम्याही प्रसिद्ध झाल्या. तेव्हा लेखा विभागाकडे चौकशी करून लवकरात लवकर हा निधी सुपूर्द केला जाईल, अशी ग्वाही पालिकेच्या मुख्य रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही दीड महिना उलटूनही पालिकेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.
डॉ. किरण जाधव यांच्या आईला दीर्घकालीन आजार आहे. त्यांना गरज असतानाही डॉक्टरांनी स्वेच्छेने दिलेला निधी त्यांच्यापर्यंत केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे पोहोचलेला नाही. या तिन्ही महाविद्यालयांमध्ये सुमारे १५ लाख रुपयांचा निधी आहे, अशी माहिती मार्डकडून देण्यात आली. गांधी जयंती नुकतीच झाल्याने त्या निमित्ताने मार्डने आता गांधीगिरी करण्याची शक्कल लढवली
आहे. सोमवारपासून पूर्ण आठवडाभर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फुलांचा गुच्छ व ‘गेट वेल सून’चे संदेश मार्डकडून पाठवले जाणार आहेत. आठवडय़ाभरानंतरही कोणतीही हालचाल झाली नाही तर नाइलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.