गेल्या दोन दशकांमध्ये महापालिका रुग्णालये असोत की शासकीय रुग्णालये प्रत्येक वेळी नातेवाईकांच्या रोषाला निवासी डॉक्टरांनाच सामोरे जावे लागते. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या बहुतेक घटनांमध्ये मार हा निवासी डॉक्टरांनाच खावा लागत असून अशा प्रसंगी वरिष्ठ डॉक्टर म्हणजे अध्यापक व प्राध्यापक गायब असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन यापुढे रुग्ण दगावल्यास नातेवाईकांना समजावून सांगण्याची जबाबदारी वरिष्ठ डॉक्टरांनीच पार पाडली पाहिजे, असा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

राज्यात गेल्या दोन वर्षांत शासकीय व पालिका रुग्णालयात मिळून डॉक्टरांवर एकूण ४० हल्ले झाले आहेत. बहुतेक प्रकरणात रुग्ण दगावल्याने अथवा लहान बालकाच्या उपचाराची योग्य माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना न मिळाल्यामुळे हे हल्ले झाले आहेत. गंभीर आजारी असलेला व दगावण्याची शक्यता असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना योग्य वेळीच रुग्णाच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यास डॉक्टरांच्या हल्ल्याचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते, असे ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. संपर्कातील अभावाचा फटका निवासी डॉक्टरांना बसत असून प्रामुख्याने रुग्णांवरील उपचार व नातेवाईकांचा सामना त्यांनाच करावा लागतो. दिवसरात्र काम करावे लागत असल्यामुळे तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना कशा प्रकारे सामोरे जावे याच्या अनुभवाचा अभाव असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या रोषाचा सामना या निवासी डॉक्टरांना करावा लागतो. पदव्युत्तर शिक्षण करीत असल्यामुळे या निवासी डॉक्टरांच्या शैक्षणिक करियरच्या साऱ्या नाडय़ा या वरिष्ठ डॉक्टरांकडे असल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार याच डॉक्टरांना सहन करावा लागतो.

शीव रुग्णालयात डॉ. रोहित कुमार याच्यावर झालेला हल्ला हा नातेवाईकांच्या रोषाचा फटका असला तरी अशा वेळी वरिष्ठ डॉक्टर कोठे असतात, असा सवाल निवासी डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांना खासगी सराव महापालिका रुग्णालयात करण्यास परवानगी असल्यामुळे अनेकदा ही मंडळी रुग्णालयातून खासगी सरावासाठी गायब होतात. शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुलेमान र्मचट यांना याबाबत विचारले असता गंभीर रुग्णाच्या अथवा रुग्ण मरण पावल्यास त्याच्या नातेवाईकांना परिस्थिती सांगण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांनीच जायला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. याबाबत आम्ही निवासी डॉक्टर व विभागप्रमुखांच्या बैठकीत यापुढे वरिष्ठ डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगण्याची जबाबदारी निश्चित केल्याचे ते म्हणाले. तसेच हाऊसमन म्हणून काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना वरिष्ठांकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी आणि विभागात काम करताना निवासी डॉक्टर व अध्यापक व प्राध्यापकांमध्ये टीमवर्क झाले पाहिजे अशा सक्त सूचना देण्यात आल्याचेही डॉ. र्मचट यांनी सांगितले. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही याबाबत बैठक घेऊन सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आदेश देताना यापुढे रुग्ण दगावल्यास वरिष्ठ डॉक्टरांनी नातेवाईकांना सामोरे जावे असे स्पष्ट केले आहे.