राज्यातील ४० हजार डॉक्टर संपात सहभागी

निवासी डॉक्टरांवरील होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात राज्यभरातील ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी पुकारलेले सामूहिक कामबंद आंदोलन बुधवारीही सुरू राहिले. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतरही निवासी डॉक्टरांनी कामावर रुजू होण्यात नकार दर्शविला. गुरुवारी राज्यातील ४० हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार असून ३ हजार पॅथॉलॉजी लॅबही बंद ठेवण्यात येणार आहेत.

बुधवारी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट (एएमसी), राज्यातील पॅथालॉजी लॅब यांनी निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनात सहभागी झाले.

गुरुवारच्या संपात राज्यातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये फक्त गंभीर रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. खाजगी रुग्णालये, नर्सिग होमही बंद ठेवण्यात येणार असून यातील आपात्कालीन विभाग सुरू राहणार असल्याचे संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले. डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध असून त्यासाठीच गुरुवारी राज्यभरातील डॉक्टर्स संपात सहभागी होणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.

गेल्या आठवडय़ात धुळ्यातील डॉ.रोहित म्हामुणकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला होता. या मारहाणीत म्हामुणकर यांचा डावा डोळा निकामी झाला. त्याच आठवडय़ात औरंगाबाद येथे डॉ. विवेक बडगे, मुंबईतील शीव रुग्णालयातील डॉ. रोहित कुमार, वाडिया रुग्णालयात डॉ. सारंग दवे यांच्यावरही रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ले झाले. या घटनांमुळे संतापलेल्या निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून सामूहिक संप जाहीर केला.

चार दिवस राज्यभरात सुरू असलेल्या या संपामुळे सार्वजनिक रुग्णालय व्यवस्था कोलमडली आहे. पहिले दोन दिवस रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांनी जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर रुग्णालयातील बाह्य़ रुग्णालय विभाग बंद करण्यात आला. अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या तर अनेक रुग्णालयांना घरी पाठविण्याचा सपाटा सुरू करण्यात आला.

दिल्लीतील निवासी डॉक्टरांचाही सामूहिक बंद

महाराष्ट्रात चार दिवसांपासून सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या सामूहिक बंदाचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचले असून दिल्लीतील निवासी डॉक्टरांनीही गुरुवारी सामूहिक कामबंद आंदोलन पुकारले आहे. गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात दिल्लीतील निवासी डॉक्टर आपत्कालीन विभाग सोडून इतर विभागात काम करणार नाहीत, तर महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांवर घेण्यात आलेल्या कारवाईवरही त्यांनी निषेध व्यक्त केला.

जन आरोग्य अभियानाचा डॉक्टरांना पाठिंबा

जन आरोग्य अभियानाने डॉक्टरांवरील हल्ल्याला सार्वजनिक व्यवस्था जबाबदार असल्याचे सांगितले. यंदाच्या वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे दिसते, असे मत अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी व्यक्त केले. रुग्ण-डॉक्टरांमधील संवाद वाढावा यासाठी प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र विभाग सुरू करावा आणि रुग्णालयात व्यवस्थेत सुधारणा आणवी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.

निवासी डॉक्टरांना नोटीस

मंगळवारी उच्च न्यायालयाने संप मागे घेण्यास नकार देणाऱ्या निवासी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबईत केईएम रुग्णालयातील ५०० निवासी डॉक्टरांना बुधवारी सकाळी नोटीस बजावण्यात आली. यातील शीव रुग्णालयात ३५०, जे.जे.रुग्णालयात ३५०, पुण्यात २००, सोलापुरात ११४  आणि नागपुरात ३७० निवासी डॉक्टरांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. मात्र यानंतर डॉक्टरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

जनहित याचिकेवर आज सुनावणी

मुंबई : संपकरी डॉक्टरांविरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर या न आल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी होणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने संपकरी डॉक्टरांच्या कृतीवर ताशेरे ओढत त्यांच्यावर आवश्यक त्या कारवाईचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे, तर भीती वाटत असेल, नोकरी सोडा, असेही बजावले होते. याशिवाय सामूहिक रजेच्या नावाखाली संप पुकारण्याचे वर्तन हे डॉक्टरी पेशाला शोभणारे नाही आणि या पेशाला काळिमा असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले होते. त्याच वेळी या डॉक्टरांनी संप पुकारलेला नाही, तर रुग्णालयात जाण्याची त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे ते सुट्टीवर गेलेले आहेत. तसेच आम्ही त्यांना संपावर वा सुट्टीवर जाऊ नका, असे आवाहन केले आहे, असा दावा करणाऱ्या ‘मार्ड’लाही न्यायालयाने धारेवर धरले होते व अशा प्रकारचा संप पुकारलेला नसल्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

‘संप मागे घेण्याचे मार्डचे आश्वासन’

मुंबई : डॉक्टरांवर हल्ले होऊ नयेत यासाठी राज्यातील सोळा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अकराशे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तात्काळ करण्यात येणार असून सर्व रुग्णालयांमध्ये सीसी टीव्ही, हल्ला झाल्यास सुरक्षा घंटा, डॉक्टरांना विमा कवच आदी अनेक उपाय करण्याचे शासनाने मान्य केले आहे. निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेबरोबर प्रदीर्घ चर्चा होऊन हे निर्णय घेण्यात आले असून संप मागे घेण्याचे आश्वासन ‘मार्ड’ने दिल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. संप मागे न घेतल्यास कायद्याप्रमाणे निवासी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवासी डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर राज्यातील ‘मार्ड’ संघटनेने पुकारलेल्या संपाला ‘आयएमए’नेही पाठिंबा दिला असून त्यांनीही या संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे ४० हजार डॉक्टर या संपात उतरणार असून वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी आज ‘मार्ड’बरोबर सखोल चर्चा करून एका आठवडय़ात ११०० सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३३ कोटी रुपये खर्च येणार असून या सुरक्षा रक्षकांना जमावाला नियंत्रित करण्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संप डॉक्टरांचा; हाल रुग्णांचे 

मुंबई : राज्यभरात निवासी डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपाचे चटके बुधवारीही मुंबईतील सार्वजनिक व सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना सहन करावे लागले. निवासी डॉक्टरांच्या बेमुदत सामुहिक संपामुळे सार्वजनिक रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभाग सलग चौथ्या दिवशी बंद राहिला. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारांकरिता नाईलाजाने खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागली.

पालिकेच्या केईएम, नायर, शीव या रुग्णालयात दर दिवशी हजारो रुग्ण बाह्य़ रुग्ण विभागात तपासणीसाठी येतात. मात्र व्यवस्थेतील दोषाचा परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया रुग्णांनी व्यक्त करीत आहेत.

हिंगोली येथे राहणारा एक रुग्ण गेले तीन महिने केईएम रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला पित्ताशयाचा आजार झाला होता. त्यामुळे त्याच्या शरीरावर सूज आली होती. मात्र बुधवारी त्याला रुग्णालयातून घरी जाण्यास सांगितले. त्याच्या नातेवाईकांची वाट न पाहता त्याला जाण्यास सांगितले. ‘मला घरी जाण्यास सांगितले आहे. पण अजूनही मला बरं वाटत नाही. माझ्या शरीरावरील सूजही कमी झाली नाही,’ असे या रुग्णाने सांगितले. मात्र दुपारी रुग्णालयातून सोडल्यानंतर आवारात आपल्या भावाची वाट पाहत तो बसून होता.

अशा पद्धतीने उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टर नाही, असे सांगून सोडण्यात आले. लालबाग येथे राहणाऱ्या सुनीता शिंदे यांच्यावर गेले अनेक दिवस शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही त्यांना थंडी वाजून ताप येत आहे. मात्र तरीही डॉक्टरांनी औषधे देऊन घरीच आराम करण्यास सांगितले, अशी तक्रार सुनीता यांनी केली. गेले दोन दिवस वॉर्डात देखरेख करण्यासाठी डॉक्टर उपस्थित नव्हते, अशी तक्रारही त्यांनी केली.

रुग्णालयात बंदोबस्त

पालिकेच्या केईएम, शीव रुग्णालयातही बुधवारी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रुग्णासोबत फक्त दोन नातेवाईकांनी उपस्थित राहावे यासाठी रुग्णालयाकडून तपासणी केली जात होती. मंगळवारच्या तुलनेत पालिका रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभागात कमी गर्दी पाहावयास मिळाली.