निवासी डॉक्टरांवरील हल्ल्याचे सत्र आठवडाभरापासून सुरूच असून संतापलेल्या डॉक्टरांनी हल्ल्यांच्या निषेधार्ह राज्यभरात सामूहिक कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

धुळ्यात डॉ. रोहित म्हामुणकर या निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी अमानुष मारहाण केली. त्यानंतर नाशिक, औरंगाबाद, मुंबई येथेही डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्या. रविवारी सकाळी शीव रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी एका डॉक्टरला धक्काबुक्की केली. त्यातच सोमवारी सकाळी मुंबईतील वाडिया रुग्णालयातही निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याने निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने संप न करण्याचे आश्वासन एका सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाला दिले आहे. त्यामुळे, मार्डच्या नेतृत्वाने या कामबंद आंदोलनापासून दूर राहायचे ठरविले आहे. परिणामी राज्यभरातील निवासी डॉक्टर वैयक्तिक स्तरावर आंदोलनात सहभागी होत आहेत. हे कामबंद आंदोलन चिघळल्यास रुग्णालयातील सेवेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

सोमवारी वाडिया रुग्णालयातील निवासी डॉक्टर सारंग दवे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार रुग्णालय व्यवस्थापनाकडे दाखल केली आहे. डॉक्टरांवरील मारहाणीची राज्यातील ही पाचवी घटना आहे. शुक्रवारी शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरवर हल्ला झाल्यानंतर या रुग्णालयात शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान र्मचट यांना निवासी डॉक्टरांनी पत्र पाठवून कामावर सुरक्षित वाटत नसल्याची भावना व्यक्त केली. मात्र या घटनेने पडसाद इतर सरकारी रुग्णालयांत पडले. सायंकाळपर्यंत केईएम, नायर आणि जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. सोमवारी जेव्हा पुन्हा वाडियात मारहाणीचा प्रकार घडला तेव्हा मात्र राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी या आंदोलनात  सहभागी होण्याचे ठरविले.

निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन मागे घ्यावे यासाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व मार्डच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यात पालिका रुग्णालयात ३०० सशस्त्र पोलीस रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध होणार असल्याचे महापौरांनी आश्वासन दिले आहे. मात्र हे आश्वासन लेखी नाही. यापूर्वीही अशा प्रकारची अनेक आश्वासने दिली गेली आहेत, अशी तक्रार मार्डच्या प्रतिनिधींनी केली. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ आणि ‘असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट’ या संघटनेतील राज्यभराच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. या संघटनांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यापर्यंत मागणीचे लेखी पत्र पोहोचवले होते. यामध्ये पालिका व सरकारी रुग्णालयांची दुरवस्था, सुरक्षा रक्षकांची गरज अशा अनेक मागण्या केल्या आहेत.

रुग्णांची गैरसोय

या संपाचा परिणाम काही प्रमाणात सरकारी आरोग्य सेवेवरही झाला. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील पालिका रुग्णालयात अपघात विभागासमोरचे प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले होते. मात्र इतर प्रवेशद्वारे बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. तर बाह्य़ रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराशिवाय पाठविण्यात आल्याची तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.