शिवडीतील पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना त्रास
क्षयरोगावर मोफत उपचार घेण्यासाठी राज्यभरातून शिवडी येथील महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना येथील कुत्र्यामांजरींकडून त्रास होऊ लागला आहे. रुग्णालयात बिनदिक्कत कुठेही शिरकाव करणाऱ्या, रुग्णांच्या खाटेवर अंग ताणून देणाऱ्या या ‘पाळीव’ प्राण्यांचे रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून लाड केले जात आहेत. मात्र अशा प्राण्यांच्या माध्यमातून रोगजंतूंचे वहन होऊन रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना धोका पोहोचण्याची भीती आहे. तर मांजरींचे केस श्वसनावाटे नाकात जाऊन श्वसनाचे विकार होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
शिवडीतील महापालिकेचे क्षयरोग रुग्णालय मुंबईच नव्हे तर आसपासच्या शहरांतील रुग्णांसाठीही महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे रुग्णांची वा त्यांच्या नातेवाईकांची नेहमी गर्दी असते. मात्र तरीही या रुग्णालयात कुत्रे, मांजरी यांचा मुक्त वावर सुरू असतो. दिवसभर हे प्राणी रुग्णकक्षात फिरत असतात आणि रिकामी खाट दिसतात त्यावरच झोपतात, असेही येथील रुग्णांनी सांगितले. एक तर क्षयरोगामुळे रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती आधीच कमी झालेली असते. अशा वेळी रुग्णालयाबाहेर घाणीत फिरून हे प्राणी रुग्णकक्षात येतात. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य खालावण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अनेकदा रुग्णांसाठी आणलेले खाद्यपदार्थ हे प्राणीच फस्त करतात, अशीही तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. अनेकदा त्यांच्या विष्ठा व मलमूत्र रुग्णालयात इतरत्र पडून असते. त्यामुळे रुग्णांना दरुगधीला सामोरे जावे लागत आहे. रुग्णांच्या खाटांवर येऊन बसणे, त्यांच्या अन्नात तोंड घालणे, रात्रीच्या वेळी रुग्णांचे खाद्यपदार्थ पळविणे या प्रकारांमुळे रुग्ण त्रस्त आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. ‘येथे क्षयरोग रुग्ण आणि नातेवाईकांना संसर्ग होऊ नये यासाठी तोंडावर मास्क लावण्यास दिले जाते. पण प्राण्यांना मास्क कसे लावता येतील,’ असा सवाल एकाने केला.

प्राण्यांनाही क्षयरोग
क्षयरुग्णांच्या खोकल्यातून निघणाऱ्या विषाणूंपासून प्राण्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या प्राण्यांनाही क्षयरोग होण्याची शक्यता वाढते, असे गोरेगाव येथील एसआरए रुग्णालयाचे फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. संदीप टिलवे यांनी सांगितले. तर ‘मांजर आणि कुत्र्यांच्या शरीरावरील केस अन्नात गेल्यामुळे रुग्णांचे आरोग्य खालावू शकते,’ असे वांद्रे येथील डॉ. एल. एम. सामंत म्हणाले.