मेट्रोसाठी डोंबिवलीकरांकडून सुरु असलेल्या मागणीची अखेर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो ५ मध्ये तळोजा – डोंबिवली – कल्याण या मार्गाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देशही एमएमआरडीएला देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मेट्रो ५ आणि मेट्रो ६ या प्रकल्पांना मंजुरी दिली होती. मेट्रो ५ मध्ये  ठाणे- भिवंडी- कल्याण या २४ कि. मी. लांबीच्या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गावर कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगांव, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळुकंभ नाका, कापुरबावडी अशी १७ स्थानके असतील. सुमारे ८ हजार ४१६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

कल्याणमधील मेट्रो मार्गी लागली असली तरी डोंबिवलीची भौगोलिक परिस्थिती पाहता डोंबिवलीत मेट्रो सुरु करण्याची गरज असल्याची मागणी स्थानिकांकडून सुरु केली जात होती. याबाबत राजकीय पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेने याप्रकरणी थेट हायकोर्टात जाण्याची तयारीही दर्शवली होती. अखेरीस डोंबिवलीकरांच्या या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. मेट्रो ५ या टप्प्यात तळोजा – डोंबिवली – कल्याण या मार्गाचा समावेश केला जाणार आहे. यासाठी शीळफाट्याजवळ मेट्रो जंक्शन उभारले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर  प्रदेश विकास प्राधिकरणाला या टप्प्याचा प्रकल्प आराखडा सादर करण्याचे आदेश दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमएमआरडीएने ठाणे,कल्याण, उल्हासनगर या भागांमध्ये घोषणांचा पाऊस पाडला आहे. मेट्रो ५ प्रमाणेच मेट्रो ६ या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो ६ मधील स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मार्गाची लांबी १४.५ किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत ६ हजार ६७२ कोटी रूपये आहे. या मार्गावर स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, जेव्हीएलआर, शामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (पश्चिम) विक्रोळी पूर्व द्रूतगती मार्ग अशी १३ स्थानके असतील. विशेष म्हणजे हजारो कोटी रुपयांची घोषणा केली जात असली तरी त्यासाठी निधी आणणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.