ताकद नसताना उगीच बेडग्या फुगवून अंगावर येऊ नये, शिवसैनिक वाघ आहे हे लक्षात ठेवावं असा खरमरीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांना लगावला. वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा १९.००८ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर ‘मातोश्री’वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, “वांद्रे पूर्वचा विजय हा निष्ठेचा विजय आहे. हा विजय मतदारांना अर्पण करत असून बाळा सावंत यांची सामान्य माणसासोबत नाळ जोडली होती. बाळाने दिलेली आश्वासन पुढील काळात नक्कीच पूर्ण करू. शिवसेना वाघ आहे आणि वाघाच्या नादाला राणेंनी लागू नये” असा टोला देखील उद्धव यांनी हाणला. तसेच मतदारांनी एमआयएमला देखील त्यांची जागा दाखवून दिली. एमआयएमने जे वोटबँकला भडकावण्याचे काम केले त्याला मुस्लिम मतदारांनीही नाकारले. मुस्लिम समाजाने ओवेसींना मतदानातून उत्तर दिले असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कुणाचा पराभव झाला हे महत्त्वाचे नाही. विजय निष्ठेचा झाला आहे. मी कुणाचे वाईट चिंतन करत नाही. त्यामुळे राणेंनी पुढे काय करावं त्यांच त्यांनी ठरवावं, असेही ते पुढे म्हणाले.