घुमान साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून फुकट प्रसारण न करण्याचा निर्णय ‘प्रसार भारती’ने घेतला आहे. आता दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून संमेलनाच्या तीन दिवसांच्या सोहळ्याचा ‘दूरदर्शन वृत्तान्त’दाखविण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रसार भारती’च्या सूत्रांनी दिली.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या थेट प्रसारणासाठी शुल्क आकारले जाऊ नये, अशी भूमिका घेतली होती. तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी यापुढील प्रत्येक साहित्य संमेलनाचा उद्घाटन व समारोप सोहळा दूरदर्शनने कोणतेही शुल्क न घेता दाखवावा, अशी मागणी केली होती. त्यावर संमेलनवाल्यानो ‘फुकटेगिरी बंद करा’ असा परखड सल्ला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिला होता. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे संस्थापक सदस्य सुबोध मोरे यांनी नाटय़ संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन व अशा प्रकारची अन्य साहित्य संमेलने  फुकट दाखविण्याची मागणी केली होती.
 माहिती व प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धन राठोड मुंबई दूरदर्शन केंद्रात आले तेव्हा त्यांनीही अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली होती. आत्तापर्यंत शुल्क आकारूनच दूरदर्शनने साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे थेट प्रसारण केले होते. त्यामुळे फुकट प्रसारणाची नवी परंपरा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका ‘प्रसार भारती’ आणि ‘दूरदर्शन’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे मांडली होती. दूरदर्शनच्या जालंधर केंद्राला तीन दिवसांच्या या सोहळ्याचे ध्वनिचित्रमुद्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावर आधारित या सोहळ्याचा ‘दूरदर्शन वृत्तान्त’ नंतर प्रसारित केला जाणार आहे. त्यासाठी  कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

घुमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र?
घुमान येथे दीर्घकाळ वास्तव्य करून केवळ घुमान गावात नव्हे तर  पंजाबमध्ये साडेसातशे वर्षांपूर्वी संत नामदेव यांनी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याची मुहूर्तमेढ रोवली. येथे होणाऱ्या ८८व्या  मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘घुमान’गावाला आता राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार आहे. साहित्य संमेलनात याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.
शेखर जोशी, मुंबई</strong>