लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या कलाकारांच्या सर्व कलाकृतींचे प्रसारण बंद करण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला आहे. एकूण १३ कलाकार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. अथक सेवा संघाचे अध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यांनी निवडणूक आयोगाकडे सदर मागणी केली होती. त्यानंतर यावर कारवाई करत दूरदर्शनतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे चित्रपट, मालिका आणि जाहिराती यांचे प्रसारण बंद करावे. या उमेदवारांच्या भूमिकांमुळे सामांन्य मतदार प्रभावीत होऊ शकतात, हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे गलगली यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यामुळे यावर बंदी आणावी अथवा त्याचा खर्च कलाकार उमेदवारांच्या निवडणुक खर्चात समाविष्टच करावा अशीही मागणी त्यांनी केली होती. आत्तापर्यंत देशभरात निवडणुकीचे एकूण पाच टप्पे पार पडले असले तरी यापुढे ह्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी,गुल पनाग, जया प्रदा,महेश मांजरेकर, राखी सावंत, परेश रावल, विनोद खन्ना, रवि किशन, मनोज तिवारी, राज बब्बर, बप्पी लहरी, नगमा, स्मृति इरानी, किरण खेर यांसारखे दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार राजकीय पटलावर आपलं नशीब आजमावत आहेत.