डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची संख्या तीनपट वाढवण्याची गरज असल्याचा अहवाल सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे दिला आहे. सुरक्षारक्षकांसोबतच दुप्पट सीसीटीव्ही आणि वॉकीटॉकीची मागणीही या अहवालांमधून करण्यात आली आहे. एकही मंजूर पद नसताना ४६ सुरक्षारक्षक नेमलेल्या लातूर विद्यालयाने १०० अतिरिक्त वॉकीटॉकी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात ५५ सुरक्षारक्षक असून अतिरिक्त १६५ पदे व १०२ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करण्याची मागणी अहवालात आहे.
निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केलेल्या लाक्षणिक संपानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी सुरक्षा अहवाल तयार करण्यात सांगितले होते. या अहवालात सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आणि वॉकीटॉकी यांची स्थिती व आवश्यकता यांची नोंद आहे. मुंबईतील जे. जे. रुग्णालयासह ११ महाविद्यालयांमध्ये सुरक्षारक्षकांची ३८४ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ४६० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. सर्व महाविद्यालयांमध्ये एकूण ३८४ सुरक्षारक्षक असून सर्वाधिक सुरक्षारक्षक नांदेड (८९), औरंगाबाद (६३) व जेजे (५५) येथे तैनात आहेत. एकही सुरक्षारक्षकाचे पद मंजूर नसताना कोल्हापूर (१९), यवतमाळ (६) व लातूर (४६) येथील रुग्णालयांनी सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यांनी अनुक्रमे २५, ६७ आणि ५४ पदांची मागणी केली आहे. सर्व रुग्णालयांमध्ये एकूण ८९६ अतिरिक्त सुरक्षारक्षक लागणार आहेत.
सीसीटीव्हीच्या संख्येनुसार औरंगाबादचा (९९) पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर नागपूर (४१), मिरज (४४) आणि अकोला (३४) यांचा क्रमांक लागतो. सर्व रुग्णालयात एकूण ३७१ कॅमेरे असून नागपूर शासकीय रुग्णालय व बीडमध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. सोलापूर, कोल्हापूर व धुळे येथे प्रत्येकी आठ कॅमेरे आहेत. जेजेमध्ये २६ कॅमेरे असून या रुग्णालयाने आणखी १०२ कॅमेरे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. अकोला रुग्णालयाने ११० तर नांदेडने १२५ अतिरिक्त कॅमेऱ्यांची मागणी केली आहे. सर्व रुग्णालयांना एकूण ६६८ अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लागतील.
सर्व रुग्णालयांकडे एकूण ८८ वॉकीटॉकी असून सुरक्षाव्यवस्था चोख करण्यासाठी आणखी २१० वॉकीटॉकीची मागणी नोंदवण्यात आली आहे. मात्र तब्बल १५२ अतिरिक्त सुरक्षारक्षकांची मागणी करणाऱ्या नागपूर रुग्णालयाने त्यांच्याकडील ९ वॉकीटॉकी पुरेसे असल्याचे सांगितले आहे. पुणे, मिरज, धुळे आणि नागपूर इंदिरा गांधी रुग्णालयानेही नवीन वॉकीटॉकीची गरज नसल्याचे सांगितले. एकही सुरक्षारक्षक नसलेल्या लातूर महाविद्यालयाने मात्र तब्बल १०० वॉकीटॉकीची गरज नोंदवली आहे. रुग्णालयांनी दिलेल्या अहवालानुसार सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही नोव्हेंबर अखेरपर्यंत पुरवण्याचे राज्य शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल, अशी आशा आहे, असे मार्डकडून सांगण्यात आले.
त्रुटी तसेच भ्रष्टाचार यामुळे सामान्यांचा संताप होतो. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी रुग्णाशी, नातेवाईकांशी संवाद साधण्याची कला एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात शिकवली जात नाही. पण ती वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी आत्मसात करायला हवी. राजकीय पक्षांच्या प्रभावाने होणारे हल्ले नींदनीयच आहेत. पण संपूर्ण आरोग्य व्यवस्था उत्तम केल्याशिवाय डॉक्टरांवरील हल्ले थांबवता येणार नाही, असे मत आरोग्य कार्यकर्ते डॉ. अनंत फडके यांनी व्यक्त केले.