हुंडाबळीच्या प्रकरणातून २३ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने एकाची निर्दोष सुटका केली आहे. हुंडय़ासाठी केलेल्या छळवणुकीनंतर संबंधित महिलेने आत्महत्या केल्याचाकुठलाही पुरावा पुढे न आल्याच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने तिच्या पतीला हुंडाबळीच्या आरोपात निर्दोष ठरविले.
दरम्यान, छळवणूक करून आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपात मात्र कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. कनिष्ठ न्यायालयाने या आरोपात त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सहा महिने तुरुंगात घालविल्यानंतर मनोहर पाटील जामिनावर बाहेर आला होता. परंतु छळवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात त्याची शिक्षा कायम ठेवल्याने उच्च न्यायालयाने त्याला तीन आठवडय़ांत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला पाटीलतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार, पवई येथे राहणाऱ्या पाटीलचे १३ मे १९९० रोजी कल्पनाशी लग्न झाले होते. परंतु लग्नात तिने आपल्यासाठी हातातील घडय़ाळ, पंखा, साडय़ा आणि दहा हजार रुपये न दिल्याने पाटीलने तिची छळवणूक करण्यास सुरुवात केली. कल्पनाने त्याबाबत भावालाही सांगितले होते. कल्पनाच्या बहिणीनेही पोलिसांना दिलेल्या जबाबात कल्पनाने पाटील तिला छळत असल्याची तक्रार केल्याचे तसेच त्या वेळी तिच्या हातावर भाजल्याच्या जखमा होत्या आणि चेहरा सुजलेला होता, असे सांगितले होते. कल्पनाचा २५ जून १९९० रोजी मृत्यू झाला.
त्याआधी १५ जून १९९० रोजी तिने केलेल्या तक्रारीत पाटीलने तिला बेदम मारहाण केल्याचे आणि भाजल्याचे म्हटले होते. परंतु तिचा भाऊ २१ जून १९९० रोजी जेव्हा तिला भेटायला गेला त्या वेळेस तिने त्याबाबत त्याच्याकडे तक्रार केली नाही, असे न्यायालयाने पाटीलला हुंडाबळीच्या आरोपात निर्दोष ठरविताना नमूद केले.