काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करणाऱया आर्थर रोड तुरूंगातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांचे निलंबन करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांची तुरूंगाच्या वैद्यकीय अधिकारी पदावरून उचलबांगडी करून पुन्हा मूळच्या आरोग्य विभागात पाठविण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांचे थेट निलंबन करण्यात आले.

भुजबळ हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. दातांच्या उपचारासाठी भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठविण्याची शिफारस तुरुंगातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने केली होती. परंतु डॉ. घुले यांनी या वैद्यकीय अहवालात फेरफार करून त्यांना दातांच्या नव्हे तर अन्य वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी नोंद केली. तुरुंगातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. चौकशीत डॉ. घुले यांनी भुजबळ यांच्या वैद्यकीय अहवालात फेरफार केल्याचे स्पष्ट झाले होते.

वाचा: छगन भुजबळांच्या वैद्यकीय कागदपत्रांत फेरफार

दरम्यान, आर्थिक गुन्ह्य़ातील कच्च्या कैद्यांना चांगले वैद्यकीय उपचार देण्याच्या मोबदल्यात तुरुंग प्रशासनाकडून लाखो रुपये ओरबाडले जातात, असा आरोप करून डॉ. घुले यांनी खळबळ माजवून दिली होती. त्यांनी केलेल्या आरोपांची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत.