मेळघाटातील आदिवासींना माणसात आणण्यासाठी आणि त्यांच्या जगण्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्यासाठी गेली ३० वर्षे मेळघाटात समर्पित वृत्तीने काम करणारे डॉ. रवी कोल्हे आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता कोल्हे यांना येथील आर. जी. जोशी फाऊंडेशनचा सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले पूर्व येथील नवीनभाई ठक्कर सभागृहात होणाऱ्या एका विशेष समारंभात एल अँड टी फायनान्स होल्डिंगचे अध्यक्ष यशवंत देवस्थळी यांच्या हस्ते या दाम्पत्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मेळघाट म्हटले की, आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न आणि कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू.. हातापायाच्या काडय़ा झालेली, पोटं फुगलेली मुले, अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडलेला आणि वैद्यकीय उपचाराविना खितपत पडलेला, किडय़ामुंगीचे जीवन जगणारा आदिवासी समाज, हेच सारे डोळ्यांसमोर येते. या समाजाला अंधारातून बाहेर काढून जीवनाचा नवा उजेड दाखविण्याचे व्रत रवी आणि स्मिता कोल्हे हे दाम्पत्य गेली ३० वर्षे स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने चालवत आहे. या काळात या दाम्पत्यावर अनेक संकटे आली, आणि आपल्या कामामागील नि:स्वार्थपणा सिद्ध करण्याच्या अनेक परीक्षाही त्यांना द्याव्या लागल्या. या संकटांशी धैर्याने सामना करीत ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या, मेळघाटातील कुपोषित बालकांचा आणि मातांचा प्रश्न सर्वप्रथम ऐरणीवर आणणाऱ्या डॉ. रवी आणि स्मिता कोल्हे यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, असे आर. जी. जोशी फाऊंडेशनचे विश्वस्त राजेंद्र जोशी यांनी सांगितले.