घुमान साहित्य संमेलनासाठी संयोजक मंडळी विमानवारी करत संमेलनस्थळी पोहोचत असताना विशेष सत्कारासाठी निमंत्रित करण्यात आलेले ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांची मात्र ३६ तास रेल्वेचा प्रवास करत घुमानला पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली. वयाची ऐंशी वर्षे गाठलेल्या रसाळ यांना प्रवासाची ही mu02दगदग झेपेल का याचा साधा विचारही संयोजकांनी केला नाही. प्रकृतीला हा प्रवास झेपण्यासारखा नसल्याने रसाळ यांनी सत्काराला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
घुमान साहित्य संमेलनात डॉ. रसाळ आणि साधना प्रकाशन यांचा विशेष सत्कार होणार आहे. त्यासाठी डॉ. रसाळ यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. घुमानमध्ये तुमचा विशेष सत्कार होणार आहे. वातानुकूलित रेल्वे प्रवासाची व्यवस्था केली आहे, असे रसाळ यांना सांगण्यात आले. रसाळ यांची ज्येष्ठता, ते विशेष निमंत्रित असताना आणि त्यांचे वय लक्षात घेऊन विमान प्रवासाची व्यवस्था असायला हवी होती. पण त्याचा साधा विचारही साहित्य महामंडळाने केला नाही.
‘आता माझे वय ८० वर्षे आहे. रेल्वे प्रवासाची व्यवस्था केल्याचा मला निरोप आला.
वय आणि प्रकृती पाहता ३६ तासांच्या प्रवासाची दगदग झेपणार नाही. डॉक्टरांनीही इतका मोठा प्रवास न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी घुमानला जाऊ शकणार नाही, असे डॉ. रसाळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. तसेच संयोजकांनी मला विमान प्रवासाचा पर्याय दिला नाही व मीही त्याबाबत विचारणा केली नाही, असेही रसाळ यांनी सांगितले.
याबाबत साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र, स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्याशी संपर्क झाला. ‘मला या प्रकाराची काहीच माहिती नाही. तुमच्याकडूनच समजत आहे.
. रसाळ यांची ज्येष्ठता व आता त्यांचे वय पाहता निश्चितच विमान प्रवासाची सोय व्हायला हवी होती. आता संबंधितांशी चर्चा करून काय झाले याची माहिती घेईन. तसेच डॉ. रसाळ यांना विमानाने संमेलनस्थळी येता यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे देसडला यांनी सांगितले.