जन्मलेल्या बाळाचे दुभंगलेले ओठ आणि टाळू पाहून बाळाच्या आईने हंबरडाच फोडला.. आता या मुलाचे कसे होणार, हा प्रश्न आई-वडिलांपुढे निर्माण झाला.. कोणीतरी लातूरच्या डॉ. विठ्ठल लहाने यांच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. घरची परिस्थिती बेताची.. ऊसतोडणी करणाऱ्या मजुराचे उत्पन्न ते किती असणार, हिम्मत करून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. खासगी रुग्णालय असूनही शंभर टक्के उपचार मोफत.. डॉक्टरांनी बाळाला तपासले आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर बाळाच्या ओठांवरचे स्मित पाहून त्या मायबापाचे आनंदाश्रू अनावर झाले.. अशा शेकडो आईबापांच्या आशीर्वादाने आपली ‘तिजोरी’ भरत लातूरचे डॉ. विठ्ठल लहाने दुभंगलेल्या ओठांवर हास्य फुलवत आहेत.
समाजातील अनेक नेत्ररुग्णांना आपल्या कौशल्याने नवी दृष्टी मिळवून देणारे डॉ. तात्याराव लहाने यांचे डॉ. विठ्ठल लहाने हे छोटे बंधू. प्लास्टिक सर्जरीमध्ये जे. जे. रुग्णालयातून ‘एमसीएच’ झाल्यानंतर मुंबईतील लीलावती, ब्रिच कॅन्डीपासून अनेक पंचतारांकित रुग्णालयांत तीन वर्षे काम केले, पण चेहऱ्यातील छोटीसी उणीव भरून काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पंचतारांकित रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा दुभंगलेल्या ओठांनिशी आयुष्य घालवणाऱ्या ग्रामीण भागातील गरिबांना आपली खरी गरज आहे, हे डॉ. विठ्ठल लहाने यांनी जाणले आणि लातूरमध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरीचे काम सुरू केले. याच क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेतील ‘स्माइल ट्रेन’ या संस्थेला शंभराहून अधिक पत्रे लिहून आर्थिक साह्य करण्याची विनंती केली. संस्थेच्या डॉक्टर व अधिकाऱ्यांनी लातूरला येऊन डॉ. लहाने यांच्या कामाची माहिती घेतली आणि जागच्या जागी त्यांच्याबरोबर करार केला. तेव्हापासून म्हणजे २००४ पासून रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे सहा हजार मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत.
आज संपूर्ण महाराष्ट्रात १८२ प्लास्टिक सर्जन असून वर्षांकाठी १५०० ते १६०० सर्जरी दुभंगलेल्या टाळू व ओठांच्या केल्या जातात. यातील ६५० हून अधिक शस्त्रक्रिया एकटे डॉ. लहाने करत असून गेली दहा वर्षे त्यांचे हे काम सुरू आहे. लातूरमध्ये त्यांची दोन रुग्णालये असून सत्तर खाटांच्या या रुग्णालयात दुभंगलेले टाळू अथवा ओठांची कोणतीही शस्त्रक्रिया चाचण्या व तपासण्यांसह मोफत करण्यात येत आहे.
दुभंगलेल्या ओठांची व्यथा
*असे व्यंग घेऊन दरवर्षी दोन हजार मुले महाराष्ट्रात जन्म घेतात. तर देशात ४० हजार मुलांचा जन्म होतो. आज देशभरात पाच लाख मुले शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
*साधारणपणे जन्मल्यानंतर तीन महिन्यांत ओठ दुभंगलेल्या मुलांची शस्त्रक्रिया करणे चांगले, तर टाळू दुभंगलेल्या मुलांची एक वर्षांच्या आत शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते. वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही तर मुलांच्या बोलण्यावर परिणाम होतो, असे डॉ. लहाने म्हणाले.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या