पालिका आयुक्त अजोय मेहता यांचा दावा

दरवर्षी मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावर सध्या करण्यात येत असलेली नालेसफाई समाधानकारक असल्याचा दावा दस्तुरखुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला आहे. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयामुळे यंदा नालेसफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील, असाही दावा त्यांनी केला.

मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईमधील सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी नालेसफाई केली जाते. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या नाल्यांची रेल्वेतर्फे सफाई केली जाते. त्यासाठी पालिकेकडून रेल्वेला पैसेही दिले जातात. नालेसफाईसाठी यंदा पालिकेने रेल्वेला २ कोटी ७९ लाख ९६ हजार ३२८ रुपये दिले आहेत. रेल्वे प्रशासनाने सध्या युद्धपातळीवर नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गुरुवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान हार्बर मार्गावरील नालेसफाईच्या कामांची रेल्वेच्या टॉवर व्ॉगनमधून पाहणी केली.

मस्जिद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, वडाळा, गुरु तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द दरम्यानच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईच्या कामांची पाहणी या दौऱ्यात करण्यात आली. रेल्वेच्या हद्दीमध्ये सध्या सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत अजोय मेहता यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रेल्वे मार्गावर सुरू असलेले काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संयुक्त पाहणी दौऱ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, उपायुक्त रमेश पवार, उपायुक्त (परिमंडळ – २) आनंद वागराळकर, पालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक प्रकाश कदम, रेल्वेचे अधिकारी सहभागी झाले होते.