दिवाळीच्या मुहूर्तावर घरखरेदीला उठाव मिळेल, या आशेने अनेक बिल्डरांनी विविध योजना जाहीर करीत आपले प्रकल्प घोषित केले असले तरी प्रत्यक्षात घरांच्या किमती पाहून मुंबईकरांचे डोळे विस्फारले आहेत. या बिल्डरांनी सध्या टू बीएचके घरेच उपलब्ध करून दिली असून या घरांसाठी किमान पावणेदोन कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. वर्षभरापूर्वी मुंबईत चार घरांचा फ्लॅट दीड कोटीत मिळत होता. मात्र आता ते शक्य नसल्याचे या विविध जाहिरातींवरून दिसून येते.
बोरिवली, मुलुंड, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी आदी ठिकाणी सध्या मोठय़ा प्रमाणात घरे उपलब्ध आहेत. काही नवे प्रकल्पही बिल्डरांनी घोषित केले आहेत. या प्रकल्पात घर आरक्षित करण्यासाठी बिल्डरांनी विविध योजना दिल्या आहेत. या जाहिरातींचा आढावा घेतला असता टू बीएचके घराची किमान किंमत एक कोटी ६० लाखांहून अधिक आहे. ही सर्व रक्कम धनादेशाद्वारे बिल्डरांनी मागितल्यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. अनेक बँका कर्ज देण्यासही तयार आहेत. तरीही म्हणावी तशी घरांची नोंदणी झाली नसल्याचे काही बिल्डरांनी सांगितले.
इंडिया बुल्स, रहेजा, रुस्तमजी, ओमकार रिअ‍ॅलिटी, एल अँड टी, मैत्री, ओबेराय, लोखंडवाला, गुंडेचा आदी अनेक बिल्डरांचे प्रकल्प सध्या अंधेरी, गोरेगाव, मालाड, दिंडोशी, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात सुरू आहेत. सदनिकेच्या एकूण किमतीच्या दहा टक्के रक्कम आधी भरा आणि त्यानंतर ८० टक्के कर्ज उपलब्ध करून देऊ आणि सर्वात शेवटी दहा टक्के रक्कम भरण्याची एक योजना आहे. या योजनेनुसार काही लाख भरून घर आरक्षित करता येत आहे. परंतु ८० टक्के कर्ज मिळेलच याची शाश्वती नसल्याचेही काही ग्राहकांना आढळून आले आहे.
घराचा ताबा दोन ते तीन वर्षांनी मिळणार असला तरी अनेक बिल्डर्स तसे लेखी देण्यास तयार नाहीत. ताबा मिळत नाही तोपर्यंत घर कर्जाचे हप्ते भरण्याची तयारीही काही बिल्डरांनी दाखविली आहे. ताबा घेतेवेळी फक्त दहा टक्के रक्कम ग्राहकाला भरावयाची आहे. बहुतांश बिल्डरांनी अशा पद्धतीचे आमिष दाखविले आहे. मात्र यापैकी अनेकांनी लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्याने ग्राहक बिथरले आहेत.
काही बिल्डरांनी सुरुवातीला २० टक्के भरले गेल्यानंतर उर्वरित ८० टक्के रक्कम काही टप्प्यांत भरण्यासाठी कर्जसुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
बहुतांश बिल्डरांनी घरकर्जाची सोय उपलब्ध करून कर्जाचे हप्ते भरण्याचे आमिष दाखविले असले तरी भविष्यात हे हप्ते थकले तर कोणाला जबाबदार धरायचे, याचाही उल्लेख करारनाम्यात केला जात नसल्यामुळे ग्राहक अशा योजनांबाबत साशंक आहेत. गृहप्रकल्पासाठी बँकांकडून थेट कर्ज घेण्यासाठी भरमसाठ व्याज दर द्यावा लागतो. त्याऐवजी ग्राहकाला सदनिका देऊन त्याच्यामार्फत गृहकर्ज घेतले तर दहा टक्क्य़ांच्या घरात कर्ज उपलब्ध होत असल्यामुळेच ही शक्कल अनेक बिल्डरांनी लढविल्याचे बोलले जात आहे.