अवघ्या दोन महिन्यांपूर्वी कामावर रुजू झालेल्या चालकाने एटीएममध्ये भरायला नेणारी तब्बल सव्वा कोटी रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. शुक्रवारी दुपारी मानखुर्द येथे ही घटना घडली.
 अमर सिंग असे या आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी तो बेलापूरच्या लॉजिकॅश या कंपनीत वाहनचालक म्हणून रुजू झाला होता. लॉजिकॅश ही कंपनी विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करते. शुक्रवारी मानखुर्द येथील सायन-ट्रॉम्बे मार्गावर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएममध्ये कंपनीचे कर्मचारी रोकड भरण्यासाठी आले होते. दुपारी साडेबारा वाजता कंपनीची व्हॅन या ठिकाणी आली. व्हॅनमध्ये एकूण १ कोटी ४४ लाख रुपये होते. त्यातील १६ लाख रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये भरण्यासाठी तीन कर्मचारी सुरक्षारक्षकासह एटीएममध्ये गेले. त्या वेळी त्यांची नजर चुकवून चालक अमर सिंग व्हॅनमधील १ कोटी २८ लाख रुपये व्हॅनसकट घेऊन पळून गेला. त्याचा मोबाइल फोन बंद होता. कर्मचाऱ्यांनी त्वरित कंपनीच्या वरिष्ठांना ही बाब कळवून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अमर सिंगचा शोध घेण्यासाठी संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. त्याचा शोध सुरू असताना काही वेळाने ही व्हॅन मांटुगा येथील डॉन बॉस्को शाळेजवळ आढळून आली. अमर सिंग व्हॅन तेथे टाकून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर सापळा लावला असून त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.