शिवाजी पार्क परिसरात हवाई उड्डाणास मनाई

प्रजासत्ताकदिनी शिवाजी पार्कवर होणाऱ्या ध्वजसंचलनाला घातपात किंवा कोणत्याही अप्रिय घटनेने गालबोट लागू नये यासाठी ड्रोनद्वारे कार्यक्रमातील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. शिस्तबद्ध ध्वजसंचलन पाहण्यासाठी उसळणारी गर्दी लक्षात घेता दरवर्षी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो. उंच आकाशात घिरटय़ा घालताना जमिनीवरील प्रत्येक घडामोड स्पष्टपणे टिपण्याची क्षमता असलेल्या या ड्रोनमुळे यंदा बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण कमी होऊ शकेल.

गुरुवारी सकाळी ९च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल आणि त्यानंतर संचलनाला सुरुवात होईल. या संचलनात राज्य पोलीस दलातील विविध पथके, सुरक्षा यंत्रणा, लष्करी तुकडय़ा, निमलष्करी दलाची पथके सहभागी होतात. संचलनासोबत साहसी खेळ, क्रीडाविष्कार  होतात. हा थरार अनुभवण्यासाठी ध्वजसंचलनाला मुंबईकर गर्दी करतात. ही गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पार्कभोवती असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेतला. सुमारे २५ कॅमेरे पार्काच्या परिघात आहेत. त्या कॅमेऱ्यांतून टिपण्यात येणाऱ्या दृश्यांवर पोलीस नियंत्रण कक्षातून ‘लाइव्ह’ नजर ठेवली जाणार आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांकडेही चित्रणासाठी कॅमेरे सोपवण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून ड्रोन उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. किमान एक ड्रोन उपलब्ध होईल, असे त्याने सांगितले. एका ड्रोनला दोन अद्ययावत कॅमेरे जोडलेले आहेत. त्यातून ठरावीक उंचीवरून खालील घडामोडी स्पष्टपणे टिपता येतात. ड्रोनने टिपलेले चित्रण तात्पुरत्या नियंत्रण कक्षातील अधिकारी डोळयात तेल घालून न्याहाळतील. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांनी शिवाजीपार्क परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ जाहीर केला आहे. तसेच शहरातील जमावबंदी आदेशाची मुदतही वाढवली आहे.

उर्वरित शहरात पोलीस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त असेल. शहरातील संवेदनशील वास्तू, प्रार्थनास्थळे, गर्दीची ठिकाणे पोलिसांच्या निगराणीखाली असतील. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका, पोलीस कारवाईला सहकार्य करा, संशयास्पद काही आढळल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधा, असे आवाहन मुंबई पोलिसांचे प्रवक्ते अशोक दुधे यांनी केले आहे.

बंदोबस्त

* परिमंडळ पाच किंवा मध्य प्रादेशिक विभागातील निवडक पोलीस मनुष्यबळ शिवाजी पार्कभोवती तैनात असेल.

* त्यांच्या मदतीला शीघ्र कृती दल, दंगलविरोधी पथकाचे सशस्त्र जवान, राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा असतील.

* पार्काच्या परिघातील उंच इमारतींवरही सशस्त्र पोलीस तैनात असतील.

* साध्या वेशात पोलीस कर्मचारी गर्दीतून वावरणार.

* परिसरातील प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी.

* वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित.

* शिवाजी पार्क प्रवेशद्वारावर धातूशोधक उपकरणाने तपासणी.