* ज्वारी, बाजरी, डाळी महागल्या * तूरडाळ, मूगडाळ नव्वदीच्या घरात * गहू, तांदूळही भाववाढीच्या वाटेवर
गेल्या महिनाभरापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना धान्याचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत ज्वारी, बाजरी या धान्यांसह डाळींचे भाव वाढू लागले असून, या दुष्काळप्रणीत महागाईच्या गरम तव्यावर भाकरी भाजून घेण्याच्या तयारीला किरकोळ व्यापारी लागले आहेत. अवघ्या पंधरवडय़ात वाशीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा मूग, तूरडाळीने किलोमागे ७० ते ८० रुपयांचा पल्ला गाठला असून, गरिबाचे धान्य म्हणून ओळखली जाणारी ज्वारी-बाजरीही किलोमागे पाच रुपयांनी महागली आहे.
विदर्भ, मराठवाडा तसेच देशातील अन्य भागांमधून मुंबईत होणाऱ्या डाळींच्या पुरवठय़ात घट होऊ लागल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे वरिष्ठ अधिकारीही मान्य करू लागले आहेत. विशेष म्हणजे, गोदामांमध्ये गव्हा-तांदळाचा मुबलक पुरवठा असला तरी कोलम, मसुरी, परिमल अशा जातीचे तांदूळ आणि एमपी सेवूर प्रकाराच्या गव्हाचे दरही काहीसे वाढू लागले आहेत.
गेल्या वर्षभर झालेल्या अपुऱ्या पावसाचा फटका भात तसेच भरड धान्याच्या उत्पादनावर झाल्याचे स्पष्ट चित्र असून विदर्भ, मराठवाडा तसेच गुजरात, राजस्थान, कर्नाटक या राज्यांतून आयात होणाऱ्या धान्याचा पुरवठाही गेल्या महिनाभरापासून कमी झाल्याचे दिसू लागले आहे. याचे परिणाम हळूहळू दिसू लागले असून, महिनाभरापूर्वी ६५ रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या तुरडाळीने ७५ रुपयांपर्यंत उडी घेतली आहे, तर ७५ रुपयांची मूगडाळ ८० रुपयांपर्यत पोहोचली आहे. ज्वारीची विक्री २५ रुपये किलोने होत असून, ३० रुपयांची बाजरी ३५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अवघ्या पंधरवडा-महिनाभरात ही वाढ झाल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रमोद जिरापुरे यांनी दिली. उडीद डाळ (६७), मसूर डाळ (४८) वाल (७५), वाटाणा (४०) यांसारख्या डाळींचे भावही किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढले आहेत. या डाळींच्या दरांमध्ये चढउतार अपेक्षित असला तरी दुष्काळी परिस्थितीचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, असा दावा जिरापुरे यांनी केला.

एक नजर  बाजारावर..
* घाऊक बाजारातील तेजीचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसू लागला असून, तुरडाळ, मूगडाळीची विक्री ९० ते ९५ रुपयांनी होत आहे.
*   गेल्या काही दिवसांपासून साखरेचा दर किलोमागे ३५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती साखर बाजारातील सूत्रांनी दिली. आठवडय़ापासून साखरेची आवक ५०० ते ८०० क्विंटलने घटल्याचे चित्र दिसू लागले आहेत. घाऊक बाजारातील उत्तम दर्जाची साखर किरकोळ बाजारात ४० ते ४२ रुपयांनी विकली जात आहे.
* कांद्याचे दर गेल्या पंधरवडय़ाच्या तुलनेत कमी झाले असून, २० रुपयांचा कांदा १४ रुपयांनी विकला जात आहे. रांगडा कांद्याची आवक वाढल्याने हा बदल दिसू लागला आहे.