26 May 2016

दुष्काळग्रस्तांना मदत हीच परमेश्वराची सेवा – शरद पवार

राज्यातील काही भागात भीषण दुष्काळ आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्याची कमतरता नाही पण पाऊस कमी झाल्याने

खास प्रतिनिधी, नवी मुंबई | February 17, 2013 5:13 AM

राज्यातील काही भागात भीषण दुष्काळ आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्याची कमतरता नाही पण पाऊस कमी झाल्याने पिण्याचे पाणी, गुराढोरांसाठी चारा आणायचा कुठून असा प्रश्न पडला आहे. दावणीला बांधलेली गुरं अस्वस्थ, भुकेली आहेत. राज्यातील सेवाभावी संस्था, उद्योग समूह, दानशूर व्यक्ती यांनी त्यांच्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून पुण्य पदरी पडण्यापेक्षा एका जिवाची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. दुष्काळग्रस्त भागातील बांधवांच्या तेथील प्राण्यांच्या हिताची जपणूक हीच खरी परमेश्वर सेवा होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नेरुळ येथील मराठी संत साहित्य संमेलनात केले.
वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने नवी मुंबई येथील नेरुळ नगरीत तीन दिवसीय दुसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. राज्यातील दुष्काळाने अस्वस्थ असणाऱ्या पवार यांनी या अस्मानी संकटाचा सामना करण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे असा आत्मविश्वास या वेळी व्यक्त केला. निसर्गाने काही भागावर डोळे वटारले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पिण्याचे पाणी सांभाळून वापरले पाहिजे. दुष्काळग्रस्त भागासाठी शहरातील नागरिकांनी पशुखाद्य दिल्यास ही सेवा सत्कारणी लागेल. समाजाला एकसंध ठेवण्याची ताकद वारकरी सांप्रदायात आहे. जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन हे काम गेली हजार वर्षे होत आहे. समृद्धी केवळ संपत्तीमुळे येत नसून ती चांगल्या गुणांनी व ज्ञानाने येत असल्याने वारकरी सांप्रदायाने हे काम अनेक वर्षे केले आहे. मानवता हाच एकमेव धर्म आहे अशी शिकवण संतांनी दिली असताना समाजातील काही घटकांची मानसिकता आजही वेगळी का आहे हे कळत नाही असेही पवार यांनी सांगितले. कोणत्याही मंदिरात पारायण सांगताना स्त्री दिसत नाही. समाजाचा-राष्ट्राचा विकास व्हावा असे वाटत असेल तर स्त्रीला वेगळे ठेवून चालणार नाही असे स्पष्ट मत पवार यांनी या वेळी व्यक्त केले. संत तुकारामांच्या शिकवणुकीनुसार चालणाऱ्या बहिणाईला तिच्या नातेवाईकांकडूनच त्रास सोसावा लागला होता. विकासासाठी सर्वाचे हात बांधले गेले पाहिजेत असे पवार यांनी स्पष्ट केले. या वेळी पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी प्रा. अभय टिळक यांच्याकडे वीणा देऊन अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. वारकरी सांप्रदायाचे खेडोपाडी कार्य पोहोचविल्याबद्दल आळंदीच्या केशवबापू कबीर महाराज यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचा स्वीकार चैतन्यमहाराज कबीर यांनी केला. याशिवाय भाऊसाहेब महाराज पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. श्रीगुरू तुकाराम महाराज काळे यांना एक गाडी (सफारी) प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला सामाजिक विधिमंत्री शिवाजीराव मोघे, बबनराव पाचपुते, स्वागताध्यक्ष गणेश नाईक, महापौर सागर नाईक उपस्थित होते. राज्यात दुष्काळ असताना नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या शाही लग्नथाटाने संतप्त झालेल्या पवार यांनी जाधव यांना जाहीर कानपिचक्या दिल्याने संत सहित्य संमेलनाच्या दिंडीवर होणारी हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी रद्द करण्यात आली. सकाळी ही दिंडी डी. वाय. पाटील संकुलातील संत गजानन महाराजांच्या मंदिरापासून निघाली होती.
समाजातील आर्थिक विषमता दूर होण्याची गरज -टिळक
करुणा हा संत साहित्याचा खरा आत्मा आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या बाबत वारकरी सांप्रदायात करुणा असणे आवश्यक आहे. राज्यातील दुष्काळाची स्थिती भयावह असून काही ठिकाणी आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही. पाण्याप्रमाणेच आर्थिक विषमता दूर करण्याची आवश्यकता असून ही विषमता दूर करण्यासाठी प्रबोधनाचे कार्य या संत संमेलनाच्या माध्यमातून होईल, असा आशावाद संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक यांनी व्यक्त केला. संत साहित्य हे अनेक अंगांने मानवी जीवनाला भिडलेले असल्याने त्याबाबत या व्यासपीठावर त्याचे विचारमंथन होईल, असेही ते म्हणाले.

First Published on February 17, 2013 5:13 am

Web Title: drought help is service to god sharad pawar
टॅग Drought,Sharad-pawar