केंद्र सरकारच्या ई-पोर्टल व ऑनलाइन फार्मसी योजनेला विरोध दर्शवीत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मंगळवारी, ३० मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे, मात्र महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्टने या संपाला विरोध दर्शविला असून राज्यातील २५ हजार औषध विक्रेते या संपात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांच्या संपात फूट चर्चा आहे.

ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून झोपेच्या गोळ्या, नार्कोटिक ड्रग्स यांसारख्या धोकादायक औषधांची बेसुमार विक्री केली जात असल्याच्या तक्रारी औषध विक्रेत्यांकडून केल्या जात होत्या. येथे अधिकृत व प्रशिक्षित औषध विक्रेता नसल्यामुळेही औषध विक्रेत्यांचा याला विरोध होता. त्यावर गेल्या महिन्यात राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाअंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्येच ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ई-पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्राने जाहीर केले. या पोर्टलवर सर्व प्रकारच्या औषध विक्रीची नोंद करणे बंधनकारक असणार आहे.

केंद्र सरकारच्या ई-पोर्टलमुळे डॉक्टरांची बेकायदेशीर प्रथा बंद पडेल, असे महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारच्या ई-पोर्टलला आमचा पाठिंबा असून राज्यातील २५ हजार औषध विक्रेते या संपात सहभागी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ऑनलाइन फार्मसी व ई-पोर्टलविरोधात मंगळवार, ३० मे रोजी देशव्यापी बंद करण्यात येणार आहे. या संपात राज्यातील ५५ हजार तर देशभरातील साडेआठ लाख औषध विक्रेते सहभागी होतील, असा दावा अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी केला आहे.