परदेशी होणाऱ्या नववर्षांच्या पाटर्य़ासाठी भारतातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली असून ती रोखण्यासाठी विमानतळावरची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा प्रोटोकॉलही बंद करण्यात आला आहे.
हवाई गुप्तचर विभागाचे पोलीस उपायुक्त समीर वानखेडे यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षांच्या स्वागतासाठी जगभरात मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ा आयोजित केल्या जातात. या पाटर्यासाठी भारतातून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यांतून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. विशेषत: मलेशिया, थायलंड, सिंगापूर, व्हिएतनाम आणि लंडनमध्ये अंमली पदार्थ भारतातून नेले जातात. पूर्वी कोकेनची तस्करी होत असे.
 पण आता कोकेनची जागा केटामाईन या पदार्थाने घेतली आहे. कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी रुपये आहे तर केटामाईनची १० लाख रुपये. केटामाईनला कोकेनचीच नशा असते. त्यामुळे हा नवा पर्याय लोकप्रिय झाला आहे.
केटामाईन देशभरात विविध ठिकाणाहून ३० हजार रुपये प्रतिकिलोने विकत घेऊन १० लाखांना विकले जाते. त्यामुळे केटामाईनची तस्करीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे आम्ही विमानतळावर कडक सुरक्षा ठेवली असून या देशांत जाणाऱ्या विमानावर विशेष लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी सांगितले. विमानतळाच्या आत बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला असून प्रोटोकॉलही बंद करण्यात आला आहे. ही सुरक्षा व्यवस्था २६ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.
३१ डिसेंबरच्या पाटर्य़ासाठी आधीपासूनच अंमली पदार्थांची तस्करी होणार हे गृहीत धरून हवाई गुप्तचर विभागाने गेल्या साडेतीन महिन्यांपासून धडक कारवाई केली होती. त्यात तस्करीची १५ प्रकरणे उघडकीस आली असून सुमारे १०० किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत ३५ कोटी रुपये होती. अटक केलेल्या १७ जणांमध्ये ७ महिलांचाही समावेश असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.