एकेका नगासाठी वीस ते तीस रुपये दाम मोजून आणलेले बेसनाचे लाडू, करंज्या, अनारसे घरच्या लहानग्यांनाच पुरेनासे होतात. माव्याची खात्री नसल्याने आणि भरमसाठ साखर असल्याने मिठाईची भेट देणेही काहीजणांना नापसंत असते. त्यामुळेच आकर्षक वेष्टन आणि २०० पासून १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या सुक्या मेव्याच्या पर्यायाकडे कॉर्पोरेट जगतासह सर्वसामान्य ग्राहकांचा ओढा वाढला आहे. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासून निगुतीने फराळाचे एकेक पदार्थ करून घरच्यांसोबतच नातेवाईकांनाही आग्रहाने देण्याची परंपरा आता आक्रसत आहे. फराळाच्या एकेका पदार्थासाठी स्वयंपाकघराचे युद्धघर करण्याऐवजी दोनेक पदार्थ चटचट बनवून उर्वरित फराळ बाजारातून विकत आणला जातो. मात्र पंचवीस रुपये मोजलेले बेसनाचे लाडू आणि तीस रुपयांची करंजी आणून पूर्वीसारखे मोठे डबे भरून ठेवता येत नाहीत. हा फराळ मोजक्याच स्वरूपात घरात येतो. त्यामुळे शेजाऱ्यांना, मित्रांना, कुटुंबियांना देण्यासाठी मिठाईचा पर्याय गेल्या काही वर्षांत पुढे आला होता. मात्र खराब झालेल्या माव्यावर दरवर्षी पडणाऱ्या धाडी आणि भरमसाठ तूप-साखरेत घोळलेली मिठाई दिवाळी सरली तरी शीतकपाटातच पडून राहण्याचे दिवस आल्याने ग्राहकांनी आता सुक्या मेव्याकडे मोर्चा वळवला आहे. सहाशे ते हजार रुपये किलो असलेला सुका मेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने आतापर्यंत केवळ कॉर्पोरेट जगातील भेटींपुरताच मर्यादित राहिला होता. मात्र अगदी २०० ग्रॅमपासूनची मिश्र सुकी फळे आकर्षक वेष्टनात २५० ते ३०० रुपयांपासून उपलब्ध झाली आहेत. सर्वसाधारण मिठाईचे दरही ४०० ते ५०० रुपये किलोपर्यंत वाढल्याने त्याऐवजी सुक्या मेव्याचा पर्याय अवलंबण्यास ग्राहकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे लहानमोठय़ा दुकानातही सुक्या मेव्याचे आकर्षक वेष्टनातील बॉक्स दिसू लागले आहेत. मिठाईप्रमाणे दोन दिवसात संपवण्याची सक्ती नसल्याने तसेच आरोग्याला उत्तम असल्याने ग्राहक आठवडाभर आधीच मागणी नोंदवून जात असल्याचे फोर्ट येथील विक्रेत्याने सांगितले.
सुका मेवा महाग वाटणाऱ्यांसाठी तसेच गोड पदार्थाची अ‍ॅलर्जी नसणाऱ्यांना चॉकलेट्सचा पर्यायही आहे. चकचकीत रंगाच्या कागदात गुंडाळलेली निव्वळ चॉकलेट ३०० ते ४०० रुपये किलो आहेत. एका किलोमध्ये साधारण ७५ चॉकलेट येतात. बदाम असलेल्या चॉकलेटचा दर ४०० ते ५०० रुपये किलो आहे. त्यामुळे मिठाईला चॉकलेटच्या स्पर्धेलाही तोंड द्यावे लागत आहे.

सुका मेव्याचे दर (रुपये प्रति किलो)
काजू – ७०० ते ११००
बदाम – ९०० ते २६००
मनुका – ३०० ते ६००
अक्रोड – ८०० ते ११००
पिस्ता – १६०० ते १८००
अंजीर – ७००
जर्दाळू – ६०० ते ७००
मिश्र – ६०० ते ८००
चॉकलेट्स
प्लेन – ३०० ते ४००
बदामासह – ४०० ते ५००