क्रीडा साहित्याची विक्री करण्याचा १०० वर्षांचा गौरवशाली इतिहास सांगणारा आणि त्यावरूनच ‘स्पोर्टस् स्ट्रीट’ असे नामाभिमान मिरवणाऱ्या काळबादेवीतील परिसराला सध्या मात्र उतरती कळा आली आहे. दुकानात क्रीडा साहित्य खच्चून उपलब्ध आहे, मात्र क्रीडाप्रेमी ग्राहक ऑनलाइन खरेदी करण्यातच मश्गुल असल्याने ‘स्पोर्टस् स्ट्रीट’वरील ३० ते ४० क्रीडा साहित्याची दुकाने ओस पडली आहेत.
क्लब, जिमखाने, मैदाने नजीक असल्याने काळबादेवीच्या परिसरात क्रिकेटची बॅट, बॉलपासून स्क्वॉश रॅकेटपर्यंत आणि फुटबॉलच्या चेंडूपासून तिरंदाजीच्या धनुष्यापर्यंत क्रीडा साहित्य पुरवणारी जवळपास ३० ते ४० छोटी-मोठी दुकाने आहेत. खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्राच्या जाणकार व्यक्तींचा येथे नेहमीच राबता असतो. यापैकी काही दुकानांना १०० वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. मात्र ग्राहकांना घरबसल्या वस्तू उपलब्ध होत असल्याने गजबजलेल्या ‘स्पोर्ट्स स्ट्रीट’वरची गर्दी रोडावली आहे.
ऑनलाइनच्या माध्यमातून ग्राहकांना साहित्याची ओळख करून दिली जाते. त्यांच्या खेळाच्या आवश्यकतेनुसार थेट घरी किंवा संस्थेत क्रीडा साहित्य पुरवले जाते. गोडाऊन शहरी भागात असावे अशी अट नसते, त्यामुळे खर्च वाचतो. दर्जाइतकेच क्रीडा साहित्याचे स्वरूप आणि त्यामधील वैविध्याला महत्त्व आले आहे. विक्री फारशी होत नसली तरी वस्तू आमच्याकडे आहे हे ग्राहकांना ठसवण्यासाठी विविधांगी गोष्टी ठेवाव्या लागतात.  -करण राय, बॉम्बे स्पोर्टस् (दुकानाला १०५ वर्षांचा इतिहास)
गेल्या वर्षी आम्ही क्रीडा साहित्याची विक्री सुरू केली. या विक्रीला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. ऑनलाइन स्तरावर क्रीडा साहित्य विक्रीला प्रचंड वाव आहे. खरेदी-विक्रीच्या पारंपरिक चौकटीपेक्षा ऑनलाइन व्यासपीठ लोकांना भावते आहे, हे विक्रीच्या वाढत्या आकडेवारीचे द्योतक आहे.
-पंकज जठार, प्रवक्ता, क्रीडा विक्री विभाग, अॅमेझॉन.कॉम

खरेदी-विक्रीच्या ऑनलाइन संकेतस्थळांमुळे व्यवसायाचे परिमाणच बदलले आहे. ऑनलाइनमुळे क्रीडा साहित्य विक्रेत्यांना सक्षम पर्याय उभा राहिला आहे. दुकानाला वेळेची आणि जागेची मर्यादा असते. ऑनलाइन कंपन्यांना ही अडचण भेडसावत नाही, त्याबाबतीत ते सरशी साधतात. प्रत्यक्ष दुकानात गेल्यानंतर वस्तू हाताळता येते, निरखून पाहता येते. मुलांच्या हट्टापायी अनेकदा पालक काही वस्तू विकत घेतात. मात्र नफ्यापेक्षा मुलाची गरज आणि खेळताना त्याला काय सोयीचे होईल हे सांगतो. फायद्याचा विचार मागे ठेवून आम्ही सल्ला देतो.
– मनोहर वागळे, वागळे स्पोर्टस् (दुकानाला १५० वर्षांचा इतिहास)