21 September 2017

News Flash

बारावीचे ग्रहण सुटले!

* सरकारी कर्मचारी, शिक्षक संपापासून दूर * रेल्वे, रिक्षा, टॅक्सी बेस्ट सुरू राहणार राज्यात २१

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 17, 2013 3:07 AM

* सरकारी कर्मचारी, शिक्षक संपापासून दूर 
* रेल्वे, रिक्षा, टॅक्सी बेस्ट सुरू राहणार
राज्यात २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा विचारात घेऊन राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहुतांश संघटनांनी २० व २१ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या संपापासून दूर राहण्याचे ठरविले आहे. याच मुद्यावर रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, एसटी व बेस्टच्या कामगार संघटनांनीही संपात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. शिक्षक संघटनांचाही संपाला विरोध आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील संघटना मात्र संपात सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून आयटक, सिटू, इंटक व बीएमएस या राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी २० व २१ फेब्रुवारीला दोन दिवसांच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. या संघटनांशी संलग्न तसेच शिवसेनाप्रणित कामगार संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला होता, परंतु संपाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून बहुतांश संघटनांनी संपातून माघार घेण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारला तीन आठवडय़ांपूर्वी संपाची नोटीस दिली होती, त्याचे साधे उत्तरही दिले गेले नाही. सरकार बेजबाबदार आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी ठरल्याप्रमाणे संपावर जाणारच असे र. ग. कर्णिक यांनी सांगितले. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अन्य संघटनांनीही संपात सहभागी व्हायचे नाही, असे ठरविले आहे. महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाने वेतनेतर अनुदानासाठी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी हा बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले आहे.
संपात यांचा सहभाग नाही..
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, एसटी कामगार काँग्रेस, नॅशनल मजदूर युनियन व सेंट्रल मजदूर युनियन, शरद राव यांची संघटना (फक्त २१ रोजी), महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद, शिक्षक भारती.
सेना-भाजपचा विद्यार्थ्यांना दिलासा
दरम्यान, या संपात शिवसेना उतरणार असली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. संपकाळात नागरी वाहतूक सुरळीत सुरू राहील याची खबरदारी शिवसेना घेईल, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे तर कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे असले तरी विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित करणाऱ्या या बारावीच्या परीक्षेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी भाजप घेईल, असे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सांगितले.

First Published on February 17, 2013 3:07 am

Web Title: eclips released of 12th students
  1. No Comments.