बुद्धीची देवता गणरायाची स्थापना करताना, आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या अपर्यावरणीय गोष्टींना फाटा देत नव्या विचारांचा ‘श्रीगणेशा’ केलेल्यांना ‘पर्यावरणस्नेही घरगुती गणेशोत्सव स्पर्धे’च्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या वतीने ‘इकोफ्रेंडली घरचा गणपती सजावट २०१५’चे आयोजन करण्यात आले होते. गणपतीच्या मूर्तीपासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टीतून अपर्यावरणीय कृतींचाच भरणा वाढतो आहे. अशा वेळी बदलाची सुरुवात करताना आपल्याच घरातून या कृतींना फाटा देत पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना पुढे नेलेल्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
‘इकोफ्रेंडली घरचा गणपती सजावट २०१५’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विभागीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी, ३ डिसेंबरला नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मालिनी शंकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे या कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत. ‘मिती क्रिएशन्स’ या सोहळ्यात ‘हे गणनायक’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहेत. गायिका आनंदी जोशी आणि गायक डॉ. राम पंडित हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये घेण्यात आली होती. एकटय़ा मुंबई विभागातून या स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’चे अविनाश कुबल आणि ‘दूरदर्शन’चे माजी अधिकारी रवीराज गंधे यांनी काम पाहिले होते. ‘चितळे डेअरी’ पॉवर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘सॅनसुई’ व ‘जनकल्याण सहकारी बँक’ यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.