आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्या याची मुंबई आणि बंगळुरू येथील १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी जप्त केली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याप्रकरणी ‘ईडी’ ही कारवाई केली आहे.
या मालमत्तेत मल्याचे ३४ कोटी रुपयांची बँकेतील रोख रक्कम, मुंबई आणि बंगळुरू येथील घरे अनुक्रमे १३०० आणि २२९१ चौरस फुटाची घरे, चेन्नई येथील ४.५ एकरचा औद्योगित भूखंड, कूर्ग येथील २८.७५ एकरवरील कॉफीची बागायत, युबी सिटी आणि बंगळुरू येथील निवासी तसेच औद्योगिक बांधकामे आदींचा समावेश आहे. विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवणारा मल्या कारवाईच्या भीतीने २ मार्च रोजी भारत सोडून पळून गेला आहे.
आयडीबीआय बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी मल्या आणि या घोटाळ्यात त्याला साथ देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या पाश्र्वभूमीवर ‘ईडी’नेही त्याच्यावर आर्थिक गैव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘किंगफिशर एअरलाईन्स’च्या नावाखाली हे कर्ज घेण्यात आले होते आणि त्यासाठी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना लाचही देण्यात आल्याचा आरोप मल्यावर असून ‘ईडी’ त्याचा तपास करत आहे.
मल्याला परत भारतात आणण्यासाठी त्याचे पारपत्र रद्द करणे, त्याच्या नावे इंटरपोल वॉरंट बजावण्यासारखे अन्य पर्याय अवलंबूनही मल्याला परत आणणे काही शक्य झालेले नाही. त्यामुळेच त्याला फरारी आरोपी घोषित करण्याची मागणीही ‘ईडी’ने विशेष न्यायालयाकडे केली आहे. मल्याचा ताबा मिळवण्यासाठी भारत-ब्रिटनमधील आरोपींच्या हस्तांतरणासाठी असलेला परस्पर विधी सहकार्य करार उपयोगात आणण्याची मागणीही ‘ईडी’तर्फे करण्यात आली आहे.