शिक्षकांवरील शिकवण्याव्यतिरिक्त असलेला कामाचा भार कमी करण्याला प्राथमिकता देणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त ‘सरकारी आणि अनुदानित शाळांपुढील आव्हाने’ या विषयावर ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजिण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिशदेत ते बोलत होते.
 शिक्षण हक्क कायदाही राज्याच्या शिक्षण पध्दतीनुसार व गरजेनुसार राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी अनुदान शिक्षकांच्या पगारावर खर्च होते. पण, हा खर्च म्हणजे एकप्रकारे शिक्षकांवर करीत असलेली गुंतवणूकच आहे. कारण हेच शिक्षक उद्याची पिढी घडविणार आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करून नये व त्यांना काळाशी सुसंगत चांगले शिक्षण द्यावे, असा सल्ला तावडे यांनी शिक्षकांना दिला.शिक्षकांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, ‘शिक्षकांची भूमिका विविधांगी असते. म्हणून त्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. शिक्षकांना भौतिक सुविधा दिल्या गेल्यास, तसेच अध्ययन, अध्यापन या प्रक्रिया सोप्या केल्यास शिक्षक अधिक चांगल्या पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल.’ त्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांची गुणवत्ता, त्याच्या आवडीनिवडी जोपासून शिक्षकांनी शिक्षण द्यावे. त्यांची कार्यक्षमता, विचार प्रक्रिया, जाणिवा, प्रयोगशीलता जागृत करण्यासाठी कृतियुक्त, बालस्नेही, आनंददायी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेची चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपली पारंपरिक चाकोरी सोडून बदलांसाठी सज्ज व्हावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बालाजी जाधव (उत्कृष्ट शैक्षणिक संकेतस्थळ), शमशुद्दीन आत्तार (उत्कृष्ट ई-लर्निग), राजेश कोगदे (डॉ.कुमुद बन्सल शैक्षणिक ग्रंथ), ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ.गिरीश बापट (डॉ.कुमुद बन्सल ग्रंथ) पुरस्कार देऊन गैरविण्यात आले.