राज्य सरकारने १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती देण्यात आली आहे आणि त्यांच्या कृषीपंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही. शेतकऱ्यांना व जनतेला दिलासा देण्यासाठी स्थायी आदेशानुसार विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. जमीन महसुलात सूट देण्यात आली असून वीजबिलात ३३.५ टक्के सूट दिली जाईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी सांगितले. शिवसेनेने दुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सरकारने तातडीने पावले टाकली आहेत.
ज्या गावांमध्ये खरिपाच्या पिकांची हंगामी सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, तेथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. त्यानुसार आता विविध उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सहकारी कर्जाचे रूपांतरण केले जाणार असून रोजगार हमी योजनेच्या निकषांमध्येही काही प्रमाणात शिथिलता आणली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ज्या गावांमध्ये भासेल, तेथे टँकर्स सुरू केले जातील. या गावांमधील विद्यार्थ्यांना १० वी ते १२ वीपर्यंतच्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे.
राज्याच्या महसूल विभागाने याबाबतचे स्थायी आदेश मंगळवारी काढले असून त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याच्या आत जनतेला दिलासा दिला गेला नाही, तर सरकारला धारेवर धरण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व आमदार व नेते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. केवळ कागदी घोडे न नाचविता सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती. या पाश्र्वभूमीवर सरकारने या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

बाळासाहेबांनी दिलेले उत्तर आठवा : उद्धव ठाकरे</strong>
मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, जालना या तीन जिल्ह्य़ांमधील दुष्काळाची पाहणी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना टीकेचे लक्ष्य केले. सत्तेत सेनेचा वाटा असेल का, या प्रश्नाचे उत्तर टाळत खडसे यांच्यावर दुसऱ्या दिवशीही खरमरीत टीका केली.  उद्धव ठाकरे यांना भुईमुगाची शेंग खाली लागते की वर, असा सवाल खडसे यांनी केल्याचे पत्रकार बैठकीत विचारण्यात आले आणि ठाकरे म्हणाले, ‘‘काल मी म्हणालो होतो, खडसे हे अजित पवारांची भाषा बोलत आहेत. आज ते शरद पवारांची भाषा बोलताहेत, असे म्हणावे लागेल. खडसेंच्या वक्तव्यांना उत्तर देता येत नाही असे नाही. खरे तर ते बाळासाहेबांनीच दिले आहे. पूर्वी शरद पवार म्हणाले होते, रताळे कुठे लागतात? त्यांना बाळासाहेबांनी दिलेले उत्तर आठवावे आणि तेच खडसेंना लागू आहे. त्यांचे रताळे होते, यांची भुईमुगाची शेंग. त्यामुळे उत्तर तेच आहे.’’

स्वतला शेतकऱ्याचा मुलगा म्हणविणारे महसूल मंत्री एकनाथ खडसे सत्तेच्या खुर्चीवर बसल्याने मुक्ताफळे उधळीत आहेत. सारवासारव करण्यासाठी खडसे यांनी मदतीसाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पण त्या अतिशय तुटपुंज्या आहेत. ‘बूँद से गई, वह हौदसे आती नही,’ अशी टिप्पणी करीत खडसे यांनी तात्पुरती मलमपट्टी करु नये.
एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते

एकनाथ खडसे  भुईमुगाच्या शेंगांवरून शरद पवार यांचीच भाषा बोलत आहेत. सत्तेमुळे त्यांना संवेदना राहिली नाही. शेंगा कुठे येतात यावर चर्चा करण्याऐवजी दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत जाहीर करा अन्यथा हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. – रामदास कदम, शिवसेना नेते

एकनाथ खडसेंच्या शेतक ऱ्यांबद्दलच्या विधानावर मी कशाला बोलू. भाजपसमवेत शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास सुंठीवाचून खोकला गेला, असेच म्हणावे लागेल.  उसाच्या दरासाठी आंदोलने करणारेच आज सत्तेत असल्याने चांगला दर मिळायला हरकत नाही. २,७०० पासून साडेतीन हजारावर ऊसदराची यांनीच मागणी केली आहे.
– शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात सर्वाधिक
नवी दिल्ली : यंदा देशभरात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील सर्वाधिक आत्महत्या (२०४) एकटय़ा महाराष्ट्रात झाल्या असल्याचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बल्याण यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.