अर्थसंकल्प मांडताना गोंधळ करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना निलंबित करुन विधानसभेत विरोधी पक्षांवर आक्रमक चढाई करणाऱ्या सत्ताधारी भाजपला विधान परिषदेत मात्र नरमाईचा पवित्रा घ्यावा लागला. विधान परिषदेच्याही १३ सदस्यांना निलंबित करण्याची भाजपची खेळी बहुमत नसल्याने फसल्याची चर्चा आहे.

विधानसभेतील १९ आमदारांच्या निलंबनाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.  कर्जमाफीची मागणी करणाऱ्या विधानसभेतील सदस्यांना निलंबित करुन सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकला जात आहे. त्याचा निषेध करीत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

विधान परिषदेत अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला, त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत प्रचंड गोंधळ घातला होता. विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या १३ सदस्यांना निलंबित करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव होता. मात्र विधान परिषदेत बहुमत नसल्याने भाजपची ही खेळी फसल्याची चर्चा आहे. विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे व उपसभापती काँग्रेसचे आहेत. सभागृहात राष्ट्रवादीचे २३ अधिक एक अपक्ष मिळून २४ सदस्य आहेत. काँग्रेसचे २१, भाजपचे अपक्षांसह २१, शिवसेनेचे ९, शेकापचे २, लोकभारती १, असे पक्षीय बलाबल आहे.

खडसेंनी सरकारला खडसावले

मुंबई : राज्यात या वर्षी तुरीचे उत्पादन वाढले असले तरी सरकारकडे तूर खरेदी करण्याची व्यवस्था नाही. खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाली नाहीत. बारदान नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता असून मीच सरकार विरोधात उपोषण करणार होतो अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.

राज्यातील तूर प्रश्नाबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून खडसे यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यावर बोलताना तुरीचे उत्पादन वाढल्याने खरेदीसाठी ३१६ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार केंद्राची संख्या वाढविण्यात येईल. हमी भावापेक्षा तुरीचे भाव जोपर्यंत वाढत नाहीत तोपर्यंत शासनामार्फत हमीभावानेच तूर खरेदी करणार असल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी या वेळी सांगितले. या वर्षी तुरीचे उत्पादन तीनपटीने वाढले असून, एक कोटी १७ लाख िक्वटल उत्पादन झाले आहे. एक हजार ६६ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अदा करण्यात आले आहेत. तसेच, आठ दिवसांत शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात शिल्लक रक्कम जमा करण्यात येतील. तसेच नाफेडची खरेदी मर्यादा वाढवून २५ लाख िक्वटल वाढविण्यात आली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.