बदल्यांचे अधिकार विकेंद्रित करून विभाग स्तरावर दिले असले तरी आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी शासकीय सेवेतील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, प्रांत, पोलीस अधिकाऱ्यांपासून परिचारिका, डॉक्टर अशा सर्वच खात्यांमधील कर्मचारी गेले दोन महिने मंत्र्यांचे उंबरे झिजवत आहेत. अशा गर्दीला आवर घालण्यासाठी आता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘बदलीसाठी भेटू नये’, अशी पाटीच आपल्या दालनात लावली आहे. त्यामुळे आमदार-खासदार, अन्य नेत्यांना आणि कर्मचाऱ्यांना आता हव्या त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घ्यावी लागत आहे.
नवीन सरकारने बदल्यांचे काही अधिकार मंत्र्यांकडून सचिव, विभागीय आयुक्त आणि खालच्या स्तरावर दिले असले तरी मंत्रालयात बदल्यांसाठी खेटे मारणाऱ्यांची गर्दी यंदा प्रचंड आहे. गेली १५ वर्षे सत्तेवर असलेले सरकार बदलल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदार-खासदारांशी, अन्य नेत्यांशी संपर्क साधून हव्या त्या ठिकाणी बदली मिळविण्याची धडपड गेले दीड-दोन महिने सुरू आहे. मंत्र्यांनी निवेदनावर शिफारशी करून किंवा दूरध्वनीवरून अनेक प्रकरणांमध्ये शिफारशीही केल्या आहेत. आधीच्या सरकारमध्येही संधान बांधून आपल्याला हवी तिथे बदली मिळविलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने आता सत्ता बदलल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेते व मंत्र्यांशी संपर्क साधून मुंबईत हव्या त्या ठिकाणी बदली मिळविली आहे. नियमित बदल्यांमध्ये असंख्य शिफारशी करण्यात आल्या. या बदल्यांची मुदत ३१ मे रोजी संपल्याने आता ‘विशेष बाब’ किंवा अनियमित बदल्या होणार आहेत. त्याचे अधिकार मंत्र्यांना नसून मुख्यमंत्र्यांकडे आहेत. अनेक मंत्र्यांनी केलेल्या शिफारशी खालच्या अधिकाऱ्यांकडून डावलण्यात आल्या आहेत आणि अनेकांच्या बदल्या ‘सोयीच्या जागी’ अजून झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक विभागाकडून अनेक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविले जात आहेत. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये, या उद्देशाने बदल्यांचे अधिकार विकेंद्रित केले खरे, पण त्यातून उद्दिष्ट साधले गेले का आणि किती बदल्यांमध्ये शिफारशी करण्यात आल्या होत्या, याचा विचार आता करावा लागणार आहे, अशी कुजबुज मंत्र्यांच्या दालनातही ऐकू येते.
आता बदल्यांचे अधिकार नसल्याने ‘बदलीसाठी भेटू नये’, अशी चक्क पाटीच महसूलमंत्री खडसे यांनी आपल्या दालनात लावली आहे. आपल्याकडे बदलीसाठी येणाऱ्या प्रत्येक आमदार-खासदार, नेत्याला व कर्मचाऱ्यांना ते बुधवारी हीच पाटी दाखवीत होते. अधिकार खालच्या स्तरावर दिल्याने मी आधीही फारशा बदल्या केल्या नाहीत आणि यापुढील बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच होतील, असे खडसे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आधीच वेगवेगळ्या तक्रारी, गाऱ्हाणी व बदल्यांसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यात बदल्यांसाठी खेटे मारणाऱ्यांची भर पडण्याची चिन्हे आहेत.