एकामागून एक आरोपांच्या फैरी झडू लागल्यामुळे अडचणीत आलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे आता त्यांच्याच पक्षातील नेते कान टोचू लागले आहेत. एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्यावर होणाऱ्या आरोपांवरून त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवे, असे भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी म्हटले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खडसेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.
ते म्हणाले, एकनाथ खडसेंविरोधात विविध आरोप होऊ लागल्यामुळे त्यांच्याभोवती संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. जमीन प्रकरणात तर सर्व आकडेही समोर आले आहेत. त्यांच्याबाबत भाजपचे पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील. पण स्वतः खडसे यांनीही आपल्यावर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्ला सत्यपाल सिंग यांनी दिला आहे.


दरम्यान, राज्यातील भाजपच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे नाराज असल्याचे समजते. खडसे यांच्या विरोधातील पुण्यातील जमिनीच्या संदर्भातील आरोपांची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे दिल्लीला पाठविण्यात आली आहेत. दिल्लीच्या पातळीवर कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे.