मराठवाडा व पश्चिम विदर्भ आज दुष्काळाने होरपळून निघत आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट आहे. त्यासाठी विशेष अधिकाराचा वापर करून केंद्राकडून तातडीची मदत मिळवून द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे केली.
उध्दव यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत राज्यपालांची गुरूवारी भेट घेतली. यामध्ये राज्यपालांनी राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करावा व राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळाबाबत महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा इत्यादी मागण्या उध्दव यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांकडे यावेळी केल्या. उद्धव यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदार उपस्थित होते. उद्धव यांनी दुष्काळाच्या भीषण वास्तव्याचा अहवालही राज्यपालांकडे यावेळी सादर केला.