सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस लोकलमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये नोकरदारांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असतो. या प्रवाशांमध्ये ज्येष्ठांचा समावेश नसतो. उपनगरीय लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या डब्याची सोय उपलब्ध करू न देण्यामागील रेल्वेने आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या या कारणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक प्रवास करत नाहीत का, असा उपरोधिक सवाल न्यायालयाने विचारला.
कर्करुग्ण, गर्भवती महिलांना लोकलमध्ये विशेष डब्याची सोय आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी एका डब्यात काही आसनेच फक्त राखून ठेवलेली असतात. परंतु गर्दीच्या वेळेत या आसनांपर्यंत पोहोचणेच काय ज्येष्ठांना गाडीत चढणेही शक्य नसते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेने विशेष डब्याची व्यवस्था करावी अन्यथा अपंगांसाठी असलेल्या डब्यामध्ये त्यांना बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या ए. बी. ठक्कर यांनी लिहिलेल्या पत्राचे रूपांतर न्यायालयाने जनहित याचिकेत करून घेतले. या मुद्दय़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन अशी व्यवस्था करता येईल का याविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश गेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने रेल्वेला दिले होते.
ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डब्याची सुविधा उपलब्ध करणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्यात आले.  या प्रतिज्ञापत्रातून मुंबईतील ज्येष्ठ नागरिक नोकरीच करीत नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगत न्यायालयाने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.