भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलीच्या धडकेने एका वृद्धाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री माहिमच्या सप्तकोतेश्वर मंदिरासमोर हा अपघात घडला. 

शिवदत्ता भोसले (६२) हे शनिवारी रात्री माहिमच्या लेडी जमजेशदजी मार्गावर रस्ता ओलांडत होते. रात्री दहाच्या सुमारास शीतलादेवी मंदिरासमोर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलीने त्यांना धडक दिली.
मोटारसायकलस्वार जुनैद शेख हा दादरच्या दिशेने जात होता. जुनैदने जखमी भोसले यांना रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भोसले हे माहिमच्या मुगल लेन येथे एका नातेवाईकाच्या ट्रॅव्हल कंपनीत काम करत होते.
माहिम पोलिसांनी जुनैदला भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली.
रविवारी त्याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.