संध्याकाळचे साडेपाच वाजले. शुकशुकाट झाल्यासारखे अचानक सर्वत्र चिडीचूप झाले. सगळा गोंगाट थांबला. भिंतींच्या हे लक्षात आले, आणि त्यांनी कानावरचे हात काढले.

‘कित्ती मोकळं वाटतंय ना?’  सतत रस्त्याकडे तोंड करून वैतागलेल्या भिंतीने शेजारच्या भिंतीला ‘कोपरखळी’ मारत विचारलं, आणि शेजारची भिंत हसली. तिने उजवीकडच्या भिंतीकडे पाहिले. ती शांतपणे रस्त्याकडच्या भिंतीच्या खिडकीतून बाहेर पहात होती. तिच्या उजवीकडची भिंत मान वाकडी करून दरवाजातून बाहेर बघत होती. सगळ्याजणी खूश होत्या. कानावर गच्च धरलेले हात बाजूला करतच चारही भिंतींनी निवांतपणे जमिनीवर बसकण मारली.

आता ‘अनुभवकथना’चा कार्यक्रम सुरू होणार होता.

हे त्या भिंतींचं नेहमीचंच असतं. दिवसभर बाहेर बघत, कान लावून ऐकत बसायचं, आणि रात्र झाली, सारं चिडीचूप झालं, की एकमेकींच्या कानाला लागून या कानाचं त्या कानात सांगायचं..

आज तर सांगण्यासारखं खूपच होतं.

गप्पा सुरू झाल्या. एक भिंत तर फारच उत्साहात बोलत होती.

‘जरा जीभ सांभाळ!’ रस्त्याकडच्या भिंतीनं डावीकडच्या भिंतीला उगीचच दटावलं. आणि साऱ्या हसल्या. मग तिला कालपरवाचा एक प्रसंग आठवला. त्याचं वर्णन करताना तिला हसू आवरत नव्हतं.. ती बोलतच सुटली, आणि तीनही भिंतींचे कान तिच्या बोलण्याकडे लागले.

‘त्याच्या जिभेला काही हाडच नव्हतं’.. आपलं बोलणं आवरत दरवाजाकडची भिंत म्हणाली.

मग उजवीकडच्या भिंतीला बोलण्याचा मोह आवरेना.. तिनंही अनुभव सांगायला सुरुवात केली.. कधीतरी तिच्याकडे पाठ करून बसलेल्या पाहुण्यांच्या जिभेचे चोचले पुरवताना, इच्छुकाच्या तोंडचे पाणी पळाले होते. जिभा तृप्त झाल्यावर नेते निघून गेल्यावर इच्छुकाने केलेला त्यांचा उद्धार आठवून ती भिंत खुदखुदत होती. ‘त्याची तर जीभ त्या दिवशी खूपच सैल सुटली होती’.. सारे वर्णन सांगताना तेव्हाचा चेहरा जणू तिच्या डोळ्यासमोर जिवंत उभा राहिला होता.

मग तिसरी भिंत बोलू लागली. समोरच्या मैदानात चाललेल्या सभेचं वर्णन करून झालं.

‘तो तर, काहीही बोलत होता. अगदी, उचलली जीभ, लावली टाळ्याला.. असं वाटत होतं, उठावं, आणि जाऊन त्याच्या जिभेला लगाम घालावा’..

तिचं हे वाक्य ऐकून तीनही भिंती गंभीर झाल्या.

‘हे नेते जिभांना धार लावूनच फिरत असतात. जिभेवर ताबाच रहात नाही कधीकधी.. जिभा कशा सैल सोडून देतात.. जिभेला लगाम घालायला शिकलं पाहिजे की नाही यांनी?’.. रस्त्याकडे तोंड करून बसलेली भिंत गंभीर होऊन म्हणाली, आणि तीनही भिंतींनी माना हलविल्या.

‘ते तर झालंच, पण जिभा घसरतात, त्याचं काय करायचं?’.. डावीकडची भिंत काळजीच्या सुरात म्हणाली, आणि समोरच्या भिंतीवर सुरू असलेल्या टीव्हीकडे सगळ्यांचे कान लागले.

बातम्या सुरू होत्या. आणि निवेदकही तेच सांगत होता.

‘परिचारकांची जीभ घसरली, पवारांचीही जीभ घसरली’..

भिंतींनी पुन्हा कानावर हात ठेवून कान गच्च दाबून धरले.

बाहेर शांतता होती, पण उद्याचा गोंगाट या शांततेत दडलाय, अशी भीती वाटून भिंतींनी डोळेही गच्च मिटून घेतले.

 काका कानजी