नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून नियमाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असतानाही त्याचे पालन न केलेल्या २८० राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. नोंदणी रद्द झालेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला कागदपत्रे सादर करण्यास ३० डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली, तरी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नोंदणीकृत राजकीय पक्षांना नियमितपणे आयकर विवरणपत्र तसेच लेखापरीक्षणाची पत्रे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. वारंवार नोटिसा बजावूनही कागदपत्रांची पूर्तता न केल्याने १६ राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाने रद्द केली होती. त्यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासह स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य आणि लोकभारती यांचा समावेश होता. यापैकी लोकभारतीवगळता अन्य तीन राजकीय पक्षांनी कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ मागितली होती. आठवले यांच्या पक्षासह तिघांना ३० डिसेंबपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यास आले आहे, पण एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.
नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, शेकाप, जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आदी २८० पक्षांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. ३० डिसेंबपर्यंत आयकर विवरणपत्र तसेच लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा या राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा सहारिया यांनी दिला आहे.