बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदारांना व्होटर्स स्लिप देण्यात येत असून मतदान केंद्रापासून मतदान क्रमांकापर्यंत सगळी माहिती मतदारांना या स्लिपद्वारे मिळणार आहे. घरपोच मिळणाऱ्या या स्लिपवर मतदारांचे छायाचित्रही असल्याने बोगस मतदानाला आळा बसेल, असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  
निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदान कुठे करायचे, आपला मतदान क्रमांक कोणता याची माहिती मिळावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना व्होटर्स स्लिपचे वाटप केले जाते. या स्लिपवर उमेदवाराचे छायाचित्र, पक्षाची निषाणी आदींचा समावेशही केला जात आहे. या स्लिपच्या माध्यमातून प्रचाराची संधी उमेदवारांना मिळत होती. परंतु आता मतदारांना ही स्लिप निवडणूक आयोगामार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर मतदाराचे नाव, मतदार क्रमांक, मतदान केंद्र व अन्य माहितीचा समावेश असेल. तसेच मतदाराच्या छायाचित्राचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची (बीएलओ) मूळ स्वाक्षरी असलेली ही व्होटर स्लिप मतदान केंद्रावर ओळखपत्र म्हणून वापरता येईल. मात्र व्होटर स्लिपची छायांकित प्रत ओळखपत्र म्हणून ग्राह्य़ धरली जाणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रचाराची आणखी एक संधी हुकली
या स्लिपवर संबंधित मतदाराचा फोटो नसल्यास त्यांनी ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, कंपनीचे ओळखपत्र, बँक/टपाल कार्यालयाकडून छायाचित्रासह दिलेले ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, आरजीआय एनपीआर, एमएनआरईजीए अंतर्गत जारी केलेले जॉब कार्ड, विमा योजना, स्मार्ट कार्डस, निवृत्ती वेतन कागदपत्र सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.