निकोप व निर्दोष लोकशाहीला मारक ठरणारी आणि आंबेडकरी राजकारणाला लाचार करणारी प्रचलित निवडणूक पद्धत रद्द करावी आणि त्याऐवजी प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाच्या निवडणूक पद्धतीचा स्वीकार करावा, या मागणीसाठी देशभर प्रबोधन व आंदोलन करण्याचा निर्धार फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांसह बहुजन समाज पक्षाचाही पार सफाया झाला. निवडणुकीत रिपब्लिकन राजकारणाचा जेव्हा जेव्हा पराभव होतो, तेव्हा ऐक्याच्या भावनिक चर्चेला उधाण येते. परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात लोकशाही शासनप्रणाली रुजवण्यासाठी तिला पूरक अशी कोणत्या प्रकारची निवडणूक पद्धत हवी होती, याचे अनेकदा सुस्पष्ट भाष्य केलेले आहे. सेक्युलर मूव्हमेंट या संघटनेच्या वतीने त्यावर मुंबईत फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन नव्या राजकीय अजेंडय़ाची मांडणी केली.
या मेळाव्यात सेक्युलर मूव्हमेंटचे प्रमुख प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचलित निवडणूक पद्धत आंबेडकरी राजकारणाला मारक व प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व निवडणूक पद्धतीचा पर्याय आणि जातीय अत्याचार व निर्मूलनाचे उपाय अशी दोन चर्चासत्रे घेण्यात आली. त्यात जयंत भालेराव, अ‍ॅड. जी. पी. लासुरे, प्रा. आनंद बनसोडे, आकाश साबळे, संग्राम सावंत यांनी भाग घेतला. सध्याच्या निवडणूक पद्धतीमुळे राजकारणातील जातीचा, धर्माचा, झुंडशाहीचा, पैशाचा प्रभाव कमी होऊ शकत नाही. त्याचबरोबर एक मत एक किंमत या तत्त्वालाही छेद बसतो. रिपब्लिकन पक्षाला निवडून येण्यासाठी कोणत्या तरी मोठय़ा पक्षाच्या आश्रयाला जाण्यास ही पद्धत भाग पाडते. त्यामुळे सध्याची निवडणूक पद्धत रद्द करावी व प्रमाणपद्ध प्रतिनिधित्व पद्धतीचा स्वीकार करावा, अशी मागणी करण्यात आली. एखाद्या पक्षाला किती टक्के मतदान होते, त्यावर आधारित कोटा पद्धतीने त्यांचे प्रतिनिधी लोकसभेत व विधानसभेत पाठवावेत, ही पद्धत खऱ्या लोकशाहीला तारक आहे. जगातील ८० देशांत ही पद्धत सुरू आहे. त्याचा भारतातही अवलंब करावा, यासाठी जनजागृतीचा भाग म्हणून देशभर चर्चासत्रे आणि जोडीला आंदोलनेही केली जातील, असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.