अव्याहत वीजपुरवठय़ामुळे कायम झगमगाटात असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात मंगळवारी रात्री विजेच्या लपंडावामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. वीजपुरवठा दोनदा खंडित झाल्याने स्थानकात अंधाराचे साम्राज्य होते. परंतु खंडित वीजपुरवठय़ाचा रेल्वेसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.

कार्यालयातून घरी निघालेल्या प्रवाशांची नेहमीप्रमाणे मंगळवारी गर्दी झाली होती. अचानक रात्री ९.२०च्या सुमारास स्थानकातील वीजपुरवठा खंडित झाला आणि रेल्वे स्थानकात अंधाराचे साम्राज्य पसरले. वीजपुरवठा का खंडित झाला, हे न समजल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मात्र ९.३०च्या सुमारास पुन्हा वीजपुरवठा सुरू झाला आणि रेल्वे स्थानक प्रकाशमान झाले. परंतु ९.४४च्या सुमारास पुन्हा वीज गेल्याने स्थानक अंधारात बुडाले. सुमारे अर्धा तास हीच परिस्थिती कायम होती. परंतु स्थानकातील इंडिकेटर सुरू होते. त्यामुळे गाडय़ांची माहिती प्रवाशांना मिळत होती. त्याचबरोबर रेल्वे सेवेवरही कोणताही परिणाम झाला नाही, असा दावा रेल्वे सूत्रांकडून करण्यात आला. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाप्रमाणेच मस्जिद रेल्वे स्थानकातही वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.

या दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती होती. वीज नसल्याने स्थानकांतील ध्वनिक्षेपक यंत्रणाही बंद होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना देऊन प्रवाशांमधील संभ्रम दूर करणे अशक्य बनले होते.