बेस्ट अभियंत्यांच्या आंदोलनामुळे..

बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील अभियंत्यांनी पाच दिवसांच्या आठवडय़ासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी पुकारलेल्या आंदोलनाचा फटका मुंबईकरांना बसला. गेल्या आठवडय़ाप्रमाणे या शनिवारीही बेस्टचे सुमारे ९०० अभियंते रजेवर गेल्याने प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली. या आंदोलनामुळे मुंबईच्या काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईकरांना रात्र अंधारात काढावी लागली. याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोमवारी, १ ऑगस्ट रोजी चर्चा करण्याचे आश्वासन अभियंत्यांना मिळाले आहे. मात्र, या चर्चेतूनही मार्ग न निघाल्यास आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे.

बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील ९०० अभियंत्यांपैकी अनेकांनी पाच दिवसांच्या आठवडय़ासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या शनिवारपासून साप्ताहिक सुट्टी घेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, या प्रश्नातून मार्ग न निघाल्याने या शनिवारीही या अभियंत्यांनी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वीजग्राहकांना त्याचा फटका बसला. शुक्रवारपासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच तांत्रिक बिघाड निर्माण झाले. हे दोष सोडवण्यासाठी अभियंते उपलब्ध नसल्याने हजारो मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. त्यातच पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी दुपापर्यंत विविध भागात बिघाड झाल्याच्या तक्रारी येत होत्या. तसेच गेल्या शनिवारी रजा आंदोलनात एका दिवसात ५९३ ठिकाणी बिघाड झाला होता.

रात्रभर अंधारात..

  • अभियंत्यांच्या रजा आंदोलनामुळे शीव येथील तमीळ संगम मार्गावरील १२ इमारतींत शुक्रवारी मध्यरात्री २.३०च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला.
  • हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अधिकारी वर्ग उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशांना रात्रभर अंधारात राहावे लागले. या परिसरातील वीजपुरवठा शनिवारी सकाळी ९च्या सुमारास पूर्ववत झाला.
  • याबाबत तक्रार करूनही बिघाड दुरुस्त झाला नसल्याची तक्रार नागरिकांनी या वेळी केली. असाच घोळ अन्य भागांतही झाला.