महावितरणच्या मुंब्रा, कळवा-खारेगाव आणि वागळे इस्टेट भागांतील वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून या परिसरामध्ये शुक्रवारी वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी ठाणेकरांची गैरसोय होणार असून काही ठिकाणी शनिवारीही हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे सहकार्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणच्या ठाणे-२ विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या खारेगाव, साकेत फिडर, कलरकेम उपकेंद्र, कळवा आणि ऐरोली नॉलेज पार्क उपकेंद्राच्या वीज वाहिनीवरील देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. या बरोबरीने वागळे इस्टेट विभागातील कोलशेत उपकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जी. बी. साऊथ व लोकमान्यनगर उपविभागातील के.व्ही.न्यू. प्रगती या वीज वाहिन्या, ठाणे-३ विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंब्रा, कौसा, दिवा व शिळ फाटा या परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या जिवनबाग उपकेंद्र शुक्रवारी आणि शनिवारीही देखभाल दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. कळवा-२, खारेगाव आणि साकेत या भागांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजता वीजपुरवठा खंडित राहणार आहे. जीवनबाग परिसरामध्ये होणाऱ्या भारनियमनाच्या वेळात बदल करण्यात आले असून सकाळी १२ ते दुपारी ३ या वेळात या भागात भारनियमन होणार आहे. जी. बी. साऊथ भागामध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात वीजपुरवठा बंद राहणार आहे. तर न्यू. प्रगती वाहिनीवरही सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात वीजपुरवठा खंडित राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.