मागील शुक्रवारी म्हणजेच २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ मुंबईकरांचा जीव गेला तर ३३ जण जखमी झाले. या अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलेले अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. शिल्पा विश्वकर्मा या मुलीचा जीव या दुर्घटनेतून वाचला आहे. जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा तिलकराम तेली या माणसाने मला ओढले आणि बाजूला केले, मी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला, तिथून स्वतःची सुटका केली. मात्र त्यानंतर तिलकराम तेली खाली पडले, त्यांच्या अंगावर काही माणसे पडली आणि चेंगराचेंगरीत त्यांचा अंत झाला अशी माहिती शिल्पा विश्वकर्माने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली.

तिलकराम तेली हे मूळचे नेपाळचे होते. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला दोन दिवसांचा प्रवास करून मुंबई गाठावी लागली. मागील १५ वर्षांपासून तिलकराम तेली हे दादर या ठिकाणी वास्तव्यास होते आणि विरार-चर्चगेट मार्गावर हमाल म्हणून काम करत होते. एल्फिन्स्टन स्टेशनवर ते बऱ्याचदा थांबत असत. त्यांच्या घरची परिस्थितीही बेताचीच होती. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर भोईवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिली आहे.

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या एक दिवस आधीच तिलकराम तेली यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला होता. मला खूप काम आहे मी फार वेळ बोलू शकत नाही असे त्यांनी सांगितल्याचे त्यांची पत्नी बृंदावतीने म्हटले. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला आर्थिक चणचण जाणवत होती. पण आम्हाला तिलकराम यांचाच आधार होता असेही त्यांच्या पत्नीने स्पष्ट केले.तेली यांना दोन मुली आहेत आणि त्या दोघींनाही वडिल जगात नाहीत याची अद्याप साधी कल्पनाही नाही असे त्यांच्या पत्नीने सांगितले.

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणी फैसल बनारसवाला आणि अब्दुल रहमान कुरेशी या दोघांनीही मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली. या याचिकेत चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एन.आय.ए.) करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. शिल्पा विश्वकर्माने सांगितलेल्या अनुभवाप्रमाणेच अनेकांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. हे सगळेच अनुभव विषण्ण करणारे आहेत.

मागील शुक्रवारी एल्फिन्स्टन आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर सकाळी साडेदहाच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३३ जण जखमी झाले. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. मृत्यूच्या दारातून परत आलो अशीच वाचलेल्या प्रवाशांच्या मनातील भावना आहे.