काळबादेवी दुर्घटनेत मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह चार अधिकारी शहीद झाल्यानंतर आता पालिका प्रशासनाने अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने पदोन्नतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला असून ही पदे येत्या १५ दिवसांमध्ये भरण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

निलंबनाची कारवाई आणि प्रदीर्घ रजा या दोन कारणांमुळे अग्निशमन दलातील अनेक पदे रिक्त आहेत. अग्निशमन दलामध्ये सध्या केवळ दोन उपप्रमुख अग्निशमन अधिकारी कार्यरत असून त्यामध्ये पी. एस. रहांगदळे आणि के. व्ही. हिरवळे यांचा समावेश आहे. काळबादेवी दुर्घटनेत ५० टक्के होरपळलेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांना नॅशनल बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुख्य अग्निशमन अधिकारी (प्रभारी) पदाची सूत्रे पी. एस. रहांगदळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
काळबादेवी दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीने अंतरिम अहवाल प्रशासनाकडे सादर केला असून तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली आणि इमारतीमधील लाकडी जिने व घातक रसायनांमुळे आग भडकल्याचे म्हटले आहे.