सक्तवसुली महासंचालनालयाने माहिती मागविली
महाराष्ट्र सदन तसेच इतर प्रकरणात अडकलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवती आता सक्तवसुली महासंचालनालयाने चौकशीचा फास आवळला आहे. खारघर (पनवेल) येथील मालमत्तेवर टाच आणल्यानंतर आता भुजबळ कुटुंबीयांच्या वांद्रे आणि सांताक्रूझमधील मालमत्तांकडेही महासंचालनालयाने लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणांतून मिळालेल्या लाचेच्या रकमेतूनच या मालमत्ता खरेदी केल्याचा दावा करीत या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मार्गाने मिळालेला कोटय़वधी रुपयांचा निधी भुजबळ कुटुंबीयांनी त्यांनी स्थापन केलेल्या विविध कंपन्यांमध्ये वर्ग केला. या कंपन्यांमार्फतच त्यांनी विविध मालमत्ता खरेदी केल्याचा निष्कर्ष महासंचालनालयाने काढला आहे. यापैकी काही निधी परदेशातील कंपन्यांकडे वळविला आणि तो पुन्हा भारतात आणला, असा दावा करणाऱ्या महासंचालनालयाने या प्रकरणी समीर आणि पंकज भुजबळ यांना चौकशीसाठी समन्स पाठविले होते. परंतु, मागितलेली माहिती खूप असल्यामुळे त्यास वेळ लागेल, असे स्पष्ट करीत या दोघांनी वेळ मागितला आहे. पंकजला कुठल्याही स्वरुपाचे समन्स पाठविण्यात आलेले नाही, असा दावाही भुजबळ कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या दोघांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
समीर भुजबळ यांच्या देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीच्या मालकीच्या खारघर येथील १६० कोटी रुपये किमतीच्या भूखंडावर सक्तवसुली महासंचालनालयाने याआधीच टाच आणली आहे. आता वांद्रे येथील हाफिज महल आणि सांताक्रूझ येथील ला पेटीट या इमारतीही याच रकमेतून खरेदी केल्याचा दावा करीत सक्तवसुली महासंचालनालयाने माहिती मागविली होती. परंतु, याबाबत ते अद्याप समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने तूर्तास ही मालमत्ता जप्त करण्याचा विचार सुरू असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. ला पेटीट या इमारतीत सध्या भुजबळ कुटुंबीयांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. याबाबत समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. याआधी याच प्रकरणात संपर्क साधला असता समीर भुजबळ यांनी हे जाणूनबुजून षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. खारघर येथील प्रकल्पाचा महाराष्ट्र सदन प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तेथील प्रत्येक रहिवाशाला घर देण्यास आपण बांधील आहोत, असा दावा केला होता. एकेकाळी आपल्यासोबत असलेल्या भागीदाराने आपल्याला बदनाम करण्यासाठी सक्तवसुली महासंचालनालयाकडे खोटी माहिती सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.