अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा निर्णय; देशातील ६० टक्के अभियंते नोकरीविना

विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल, त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान आणि उद्योगकतेची गरज यांची सांगड न घालता वर्षांनुवर्षे सुरू असलेले अभियांत्रिकी शिक्षण कालबाह्य़ होऊ लागल्यामुळे देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या लक्षावधी अभियंत्यांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) उद्योगांची गरज लक्षात घेऊन आवश्यक ते बदल अभियांत्रिकी अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना ते चालवत असलेल्या अभ्यासक्रमांपैकी किमान पन्नास टक्के अभ्यासक्रम हे ‘नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडेशन’कडून आगामी पाच वर्षांत मानांकित करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा धसका घेऊन पायाभूत सुविधा उभारण्यास असमर्थ असलेल्या आणि प्रवेशक्षमता कमी झालेल्या २७५ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपली महाविद्यालये बंद करण्यासाठी एआयसीटीईकडे अर्ज सादर केले आहेत.

देशभरातील दहा हजारांहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांचे नियमन हे एआयसीटीई करत असून या महाविद्यालयांमधून सात लाखांहून अधिक पदवीधर दरवर्षी बाहेर पडत असतात. यातील साठ टक्के अभियंत्यांनाही आज नोकऱ्या उपलब्ध होत नसल्याची गंभीर बाब केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे कालबाह्य़ अभ्यासक्रमात बदल क रणे, अभियांत्रिकी महाविद्यालयांची दजरेन्नती, अध्यापकांचे नियमित प्रशिक्षण, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या काळात औद्योगिक अनुभवाची सक्ती, असे अनेक मुद्दे घेऊन ‘एआयसीटीई’ने नियोजनाचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या अनेक विषयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे देशभरातील अनेक महाविद्यालयांमधील जागा मोठय़ा प्रमाणात रिकाम्या राहू लागल्या आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा कोणत्याही परिस्थिती उत्तम राहिलाच पाहिजे यासाठी ‘एनबीए’चे मानांकन मिळवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यापुढे प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘उद्योग सल्लागार समिती’ नियुक्त करून त्याच्या माध्यमातून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा मानसही एआयसीटीच्या सूत्रांनी व्यक्त केला.

२७५ महाविद्यालयांचा महाविद्यालय बंद करण्यासाठी अर्ज

मोठय़ा संख्येने जागा रिकाम्या राहू लागल्यामुळे अनेक महाविद्यालयांनी आपले महाविद्यालय बंद करण्यासाठी एआयसीटीईकडे अर्ज केले आहेत. यापूर्वी महाविद्यालय बंद करण्यासाठी प्रचंड फी द्यावी लागत होती. त्यात कपात करण्यात आल्यामुळे यंदा देशभरातील २७५ महाविद्यालयांनी आपले महाविद्यालय बंद करण्यासाठी एआयसीटीईकडे परवानगी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण अनिवार्य

अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे उद्योगांपुढेही त्याला नव्याने प्रशिक्षण देण्याशिवाय पर्याय राहात नाही हे लक्षात घेऊन आगामी काळात किमान दोन महिने थेट उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण हे अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच उद्योगांची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील, असे एआयसीटीईच्या सूत्रांनी सांगितले.