त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची.. पण परिस्थितीवर त्याने मात करून शिक्षण घेतले आणि गुणवत्तेच्या जोरावर ‘व्हीजेटीआय’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिष्यवृत्तीही मिळवली. सर्व काही सुरळीत सुरू होते आणि अचानक हा विद्यार्थी एका वादग्रस्त आध्यात्मिक बुवाच्या नादी लागला. तेथून त्याची अधोगती सुरू झाली आणि त्याने चोरीचा मार्ग पत्करला. लॅपटॉप चोरीच्या प्रकरणात माटुंगा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ही शोकांतिका आहे राजेश माळी (२०) या विद्यार्थ्यांची. राजेश मूळचा जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगावचा. दहावीला त्याला ९१ टक्के गुण मिळाले. त्या जोरावर त्याला मुंबईच्या प्रख्यात ‘व्हीजेटीआय’ या शिक्षण संस्थेत पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. त्याची गुणवत्ता पाहून त्याला विनामूल्य प्रवेश देण्यात आला. तो कल्याणला काकांच्या घरी राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्याचे एक शिक्षक त्याला महाविद्यालयाचे शुल्क पाठवत असत. प्रचंड हुशार असणाऱ्या राजेशने पहिल्या वर्षी महाविद्यालयाची शिष्यवृत्तीही मिळवली.
सुरुवातीची दोन वर्षे चांगली गेली, पण नंतर राजेश एका वादग्रस्त बुवाच्या नादी लागला आणि चक्र फिरले. ‘व्हीजेटीआय’ महाविद्यालयात ५ मार्च रोजी एक लॅपटॉप चोरीची घटना घडली. माटुंगा पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटक केली. ‘यूडीसीटी’ येथेही दोन लॅपटॉप चोरीच्या घटना घडल्या होत्या, पण त्याबाबत तक्रार करण्यात आली नव्हती. राजेशच्या घरातून लॅपटॉप जप्त करण्यात आला. या बाबाच्या नादी लागल्याने तो तिसऱ्या वर्षांत अनुत्तीर्ण झाला. याबाबत माहिती देताना माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे यांनी सांगितले की, तो सकाळी महाविद्यालयात जातो, असे सांगून निघायचा, पण दिवसभर त्या बाबाच्या मठात घालवायचा. त्यामुळे त्याचे अभ्यासावरून लक्ष उडाले. त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याच्या वडिलांकडे भाडय़ाचे पैसेही नव्हते आणि ते कर्ज काढून मुंबईला आले.